News Flash

आरोग्य सेतू अ‍ॅप कुणी तयार केलं माहिती नाही; केंद्राचं RTIच्या अर्जाला उत्तर

केंद्रीय माहिती आयोगानं घेतलं फैलावर

करोनाचा शिरकाव झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करण्याचं आवाहन केलं जात आहे. प्रवासासह अनेक ठिकाणी हे अ‍ॅप सक्तीचं करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही या अ‍ॅपचं कौतुक केलं आहे. मात्र, या अ‍ॅपबद्दल केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय माहिती केंद्र (National informatics centre) यांनी हे अ‍ॅप कुणी तायर केलं याविषयी काहीही माहिती नसल्याचं उत्तर दिलं आहे. माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या माहितीवर हे अजब उत्तर देण्यात आलं असून, केंद्रीय माहिती आयोगानं यावरून फैलावर घेतलं आहे.

लाईव्ह लॉ’ने हे वृत्त दिलं आहे. केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) मंगळवारी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी (CPIO), राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) व NeGD यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आरटीयच्या अधिनियमांनुसार कलम २० अंतर्गत गुन्हा का दाखल केला जावू नये? असा सवाल केला आहे. या सर्वांवर आरोग्य सेतु अ‍ॅप संबंधित आरटीआयला प्रतिसाद आणि उत्तर न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आरोग्य सेतूच्या वेबसाइटवर हे अ‍ॅप एनआयसीच्या प्लॅटफॉर्मवर डिझाईन, डेव्हलप आणि होस्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.  मात्र, एनआयसीला यासंदर्भात माहिती कशी नाही असा सवाल केंद्रीय माहिती आयोगानं केला आहे. केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य आयुक्त वनजा एन. सरण यांनी यासंदर्भात लेखी उत्तर मागितले आहे. तसेच त्यांच्याकडे काही माहिती नसल्यास https://aarogyasetu.gov.in/ ही वेबसाइट gov.in या नावाने वेबसाइट कशी तयार केली गेली,” असा सवाल करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.

कोणत्याही केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याने हे अ‍ॅप कोणी तयार केले, फाइल्स कोठे आहेत याबद्दल माहिती दिलेली नाही. लाईव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय माहिती आयोगाने सौरव दास यांच्या तक्रारीनंतर हे आदेश दिले आहेत. “या प्रकरणात एनआयसी, नॅशनल ई-गव्हर्नन्स विभाग (एनजीडी) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आरोग्य सेतु अ‍ॅप आणि त्याच्या निर्मितीशी संबंधित अन्य प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. अ‍ॅप तयार करण्याबाबत एनआयसीकडे माहिती नाही असे याचिकेत सांगण्यात आले आहे,” असे वनजा एन. सरण यांनी सांगितले. “जर तुम्ही हे अ‍ॅप बनवले असेल, तर हे उत्तर आश्चर्यकारक आहे,” अशा शब्दात सरण यांनी कानउघडणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 4:01 pm

Web Title: dont know who created the arogya setu app centres reply to rti application abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सौदी अरेबियानं पाकिस्तानच्या नकाशातून वगळले पीओके, गिलगिट-बाल्टिस्तान
2 … तर लोक मोदींना हाकलून लावतील; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
3 गोव्यातील कॅसिनो १ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार; मात्र…
Just Now!
X