X
X

३ सप्टेंबरला नवीन कोणीतरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं समजतंय – कुमारस्वामी

कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये कुरबूर सुरुच

कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस आघाडीचं सरकार आल्यापासून या दोन्ही पक्षात एकमेकांविरुद्ध कुरबूर सुरुच आहे. एकीकडे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मला जर जनतेचा आशीर्वाद मिळाला तर मी पुन्हा एकदा कर्नाटकचा मुख्यमंत्री होईल, असं विधान केलं असताना त्यांच्या विधानावर सध्याचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी एक मोठं विधान केलं आहे. माध्यमांतील माझ्या मित्रांकडून ३ सप्टेंबरला नवीन कोणीतरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे असं मला समजलंय, असं कुमरस्वामी म्हणाले.

मला असे समजले आहे, की ३ सप्टेंबरला नवीन कोणीतरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. पण मला त्याची चिंता नाहीये. मी किती काळ मुख्यमंत्री म्हणून राहील यापेक्षा, मी जे काम करत आहे, तेच माझे भविष्य ठरवेल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही कुमारस्वामी यांनी कोणाचंही नाव न घेता केला केला. पण, आमचं सरकार पडणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

काय म्हणाले होते सिद्धरामय्या –

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवली होती. मी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी विरोधकांनी हातमिळवणी केली होती. सध्या राजकारणात जात आणि पैशांचं महत्व वाढलं आहे. पण राजकारण कायम बदलत असते. मी पुन्हा एकदा लोकांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री होईल, असे सिद्धरामय्या म्हणाले होते. दोन्ही मोठ्या नेत्यांच्या अशाप्रकारच्या वक्तव्यांमुळे येथे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

21
X