संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ने आज हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ या क्षेपणास्त्राचे  यशस्वी परीक्षण केले. सुखोई -30 एमकेआय या लढाऊ विमानाद्वारे या क्षेपणास्त्राचे परीक्षण करण्यात आले. पश्चिम बंगालमधील हवाई तळावरून सुखोईने या क्षेपणास्त्रासह भरारी घेतली होती.

संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असलेल्या या क्षेपणास्रात ७० किलोमीटर अंतरावरील लक्ष भेदण्याची क्षमता आहे. चाचणीप्रसंगी या क्षेपणास्त्राने हवेत तरंगणाऱ्या आपल्या लक्षाचा अचुक वेध घेतला. आतापर्यंत या क्षेपणास्त्र प्रणालीतील २७ क्षेपणस्रांचे त्यांची कामगिरी निश्चित करण्यासाठी व त्यांना मान्यता देण्यासाठी परीक्षण केल्या गेले आहे.

भारत सरकारने मार्च २००४ मधील ९९५ कोटींच्या अर्थसंकल्पात ‘अस्त्र’ च्या योजनेस मंजुरी दिली होती. डीआरडीओ अंतर्गत हैदराबादेतील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेस अस्त्र क्षेपणास्त्रांच्या रचना आणि विकासासाठी काम करणारी एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पहिल्या अस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी सुखोई -30 एमकेआय या लढाऊ विमानाद्वारे मे २०१४ मध्ये घेण्यात आली होती.

भारताच्या संरक्षणसामग्रीत असलेले  ‘अस्त्र’  नावाचे हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारे विमानभेदी क्षेपणास्त्र आहे. हे  भारतीय बनावटीचे असून  १५ किलो स्फोटके घेऊन प्रवास करू शकते. सुपरसॉनिक गतीने हे क्षेपणास्त्र मारा करते.