संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ जम्मू आणि श्रीनगरमध्ये ५०० बेड्सची २ कोविड रुग्णालये उभारणार असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रिय गृह सचिव अजय भल्ला यांनी ही रुग्णालये उभारण्यासंदर्भातल्या प्रस्तावांचा आढावा घेतला. एका उच्चस्तरीय बैठकीत यावर चर्चा झाली.

भल्ला यांनी ही रुग्णालये उभारण्यासाठी योग्य जागा निवडण्याचे आदेश जम्मू काश्मिर प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर त्यांनी डिआरडीओला तज्ज्ञांच्या पथकाच्या मदतीने या रुग्णालयांसाठीचं अंदाजपत्रक सादर करण्यासही सांगितलं आहे.

सध्याच्या जम्मू काश्मिरमधल्या आरोग्य सुविधा पुरेशा असून रुग्णांच्या गरजा भागत आहेत. मात्र परिस्थिती अशीच कायम राहिल्यास रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता भासू शकते. मात्र काही दिवस पुरेल एवढ्या सुविधा असल्याने लवकरच ही कोविड रुग्णालये उभारण्याची मागणी करण्यात आली आहे असं भल्ला यांनी सांगितलं. या कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन असलेले बेड्स असतील तसंच १२५ आयसीयू बेड्सही उपलब्ध असतील.

देशात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस करोनाची लागण होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे देशात अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांची कमतरता भासू लागली आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचा जीव गेल्याच्याही घटना समोर येत आहेत. दरम्यान, देशात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण कऱण्यात येणार आहे. आजपासून यासाठीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.