एखाद्या व्यक्तीला केलेल्या गुन्ह्याबद्दल ५०० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्याचं कधी तुम्ही ऐकलं नसेल पण असं घडलंय. दुबईच्या कोर्टाने एका गोवेकराला तब्बल ५०० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.  २०० मिलियन डॉलरच्या चिटफंड घोटाळ्याप्रकरणी रविवारी दुबईच्या कोर्टाने सिडने लेमोस (वय ३७ ) आणि त्याचा सहकारी रेयान डिसोझा (वय – २५) यांना ही शिक्षा सुनावली.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सिडने लेमोस आणि रेयान डिसोझा हे दोघं हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. एक्सेन्शल या त्यांच्या कंपनीद्वारे किमान २५ हजार डॉलरची गुंतवणूक केल्यास वर्षाला १२० टक्के परतावा मिळेल असं आमिश दाखवणारी त्यांची स्किम होती. सुरूवातीला त्यांनी गुंतवणूकदारांना पैसे दिलेही , पण मार्च २०१६ नंतर त्यांनी पैसे देणं बंद केलं. अखेर दुबईच्या आर्थिक विभागाने कारवाई करत जुलै २०१६ मध्ये कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकलं. त्यानंतर सील केलेल्या कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करून कादगपत्रं चोरल्याप्रकरणी लेमोनच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.  पण जानेवारी २०१७ मध्ये  ती भारतात पळाली असल्याची माहिती आहे.

२०१५ साली इंडियन सुपर लिगचा संघ FC Goa ची स्पॉन्सरशिप लेमोसच्या FC Prime Markets कंपनीने घेतली आणि लेमोस सर्वप्रथम चर्चेत आला होता.