देशात इंधनाच्या दरांचा भडका उडाला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. तर दिल्लीमध्ये पेट्रोल ९० रुपये लीटरहून अधिक किंमतीला मिळत आहे. मुंबईमध्येही पेट्रोलचे दर ९५ रुपये लीटरच्या पुढेच आहेत. याच इंधनदरवाढीवरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. याचसंदर्भात आता केंद्रीय तेल व वायू मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी उत्तर दिलं आहे. प्रधान यांनी इंधनाच्या दरांचा भडका का उडाला आहे यासंदर्भातली एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाष्य केलं आहे.

प्रधान यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्या तेल महाग झाल्याचं म्हटलं आहे. “आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. या किंमती हळूहळू कमी होईल. करोनामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला आणि निर्मितीला फटका बसला,” असं प्रधान यांनी इंधन दरवाढीचे कारण सांगताना म्हटलं आहे.

कच्च्या तेलापासून निर्माण होणाऱ्या पदार्थांच्या किंमती कमी होण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचेही प्रधान यांनी म्हटलं आहे. “आम्ही सातत्याने जीएसटी काऊन्सीलला पेट्रोलियम पदार्थांना कर सवलत देण्यासंर्भांत विनंती करत आहोत. यामुळे सर्वसामान्यांना फायदा होईल. मात्र अंतिम निर्णय त्यांचा असणार आहे,” असं प्रधान म्हणाले आहेत.

सोनिया गांधी यांनी इंधन दरवाढीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करतही प्रधान यांनी केलाय. “सोनियाजींना ठाऊक असेल की राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये इंधनावर सर्वाधिक कर आकारला जातो. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये केंद्र आणि राज्याची कमाई अगदी अल्प प्रमाणात झाली होती. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केलीय,” असं प्रधान यांनी सोनिया गांधीनी मोदींना पाठवलेल्या पत्रासंदर्भातील प्रश्नावर बोलताना सांगितलं.

सोनिया गांधी यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रामध्ये राजधर्माचे पालन करण्याचा सल्ला दिला होता. त्याचबरोबर उत्पादन शुल्क अंशत: कमी करुन हे दर कमी करण्याचं आवाहन केलं होतं. सरकार लोकांच्या दु:खापासून फायदा लाटत असल्याच आरोपही सोनिया यांनी केला होता.