श्रीनगरमध्ये कडाक्याची थंडी पडत असल्याने येथील सेंटॉर हॉटेलमध्ये ५ ऑगस्टपासून नजरकैदेत ठेवलेल्या सर्व ३४ राजकीय कैद्यांना जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने आमदार निवासात (एमएलए हॉस्टेल) हलविले आहे. सेंटॉर हॉटेलमध्ये वातावरण उबदार ठेवण्यासाठी पुरेशी सुविधा नसल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

थंडीचा कडाका वाढल्यानंतर नजरकैदेत ठेवलेले नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रकृती बिघडल्याच्या तक्रारी केल्या आहेत. थंडीचा फटका तेथे तैनात केलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांनाही बसला आहे.

सेंटॉर हॉटेल हे निसर्गरम्य दल सरोवराच्या काठावर आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेचा अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर ५ ऑगस्टला या राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सरकारने ताब्यात घेतले होते. त्यांची रवानगी या हॉटेलमध्ये करण्यात आली होती. तेथून त्यांना शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आमदार निवासात हलविण्यात आले आहे. त्यासाठी तेथील सदनिकांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. हे ठिकाण पर्यायी तुरुंग म्हणून घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, सज्जाद लोन आदी नेत्यांना पोलिसांनी धक्काबुक्की करून बळाचा वापर केल्याचा आरोप मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा यांनी केला असून पोलिसांनी तो फेटाळला आहे.

मेहबूबा मुफ्ती श्रीनगरमधील शासकीय निवासात

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना थंडीपासून बचाव होण्यासाठी शुक्रवारी श्रीनगर शहरातील शासकीय निवासात हलविण्यात आले होते. त्यांना याआधी झबेरवान पर्वतरागांच्या पायथ्याशी असलेल्या पर्यटक कुटीमध्ये ठेवण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हॉटेल बिलाचा वाद : सेंटॉर हॉटेल हे भारतीय पर्यटन विकास महामंडळाच्या मालकीचे आहे. राजकीय कैद्यांच्या मुक्कामाचा खर्च म्हणून या हॉटेलने सरकारला सुमारे तीन कोटींचे देयक पाठविले आहे. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे देयक फेटाळून लावले आहे. राजकीय कैद्यांच्या मुक्कामासाठी हे हॉटेल आधीच पर्यायी तुरुंग म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या हॉटेलला प्रतिदिन पाच हजार रुपये दराने नाही, तर सरकारने मान्य केलेल्या प्रतिदिन आठशे रुपये दराने देयक दिले जाईल, असे हा अधिकारी म्हणाला.

स्फोटात जवान शहीद

जम्मू : अखनूर सेक्टरमध्ये रविवारी आयईडी स्फोटात एक जवान शहीद झाला असून, दोन जण जखमी झाले. पालनवाला भागात जवान गस्त घालत असताना स्फोट झाला. त्यात संतोष कुमार हे शहीद झाले. असून, ते मूळचे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील पुरा भदौरिया या गावचे होते.

रेल्वेसेवा पूर्ववत

काश्मीर खोऱ्यात जवळपास तीन महिन्यांनंतर रविवारी रेल्वेसेवा पूर्ववत झाली. गेल्या मंगळवारी बारामुल्ला ते श्रीनगरदरम्यान रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर रविवारी श्रीनगर ते बनिहालपर्यंत रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात आली. सोमवारपासून रोज दोन गाडय़ा या मार्गावर धावतील.