नवकरोना विषाणूला प्रतिकार करणारी प्रतिपिंडे ही वेगवेगळ्या वेगाने कमी होत जातात. काहींमध्ये ती काही दिवस टिकतात तर इतरांमध्ये ती काही वर्ष राहू शकतात, असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे.

करोनाच्या तीव्रतेवर प्रतिपिंड किती दिवस टिकणार हे अवलंबून असते. ‘लॅन्सेट मायक्रोब’ नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधातील माहितीनुसार जे लोक बरे झाले आहेत व ज्यांच्यात विषाणू नष्ट करणारी प्रतिपिंडे कमी आहेत त्यांच्यात ‘टी’ पेशींच्या स्वरूपात भक्कम प्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे. त्यांना करोना संसर्ग परत होत नाही.

सिंगापूर येथील ड्युक एनयूएस मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांनी करोनाच्या रुग्णांवर ६ ते ९ महिने लक्ष ठेवले. त्यांच्या माहितीनुसार सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणू विरोधात जर संसर्गानंतर प्रशिक्षित टी पेशींची संख्या वाढली व सूचनादर्शक रेणू वाढले तर त्या व्यक्तीला नंतर करोनाचा संसर्ग परत होऊ शकत नाही. त्यानंतर त्यांनी या माहितीवर आधारित अल्गॉरिदम तयार करून लोकांच्या विषाणूनाशक प्रतिपिंडांचा भाकीतवजा नकाशा तयार केला. त्यांनी या रुग्णांचे पाच गट केले. ते त्यांच्यात प्रतिपिंड किती काळ टिकून राहिले यावर आधारित होते.

पहिल्या गटातील रुग्णात विषाणूरोधक प्रतिपिंडे तयार झाली नाहीत त्यांचे प्रमाण ११.६ टक्के होते. झपाट्याने प्रतिपिंड वाढून नंतर ते घटणाऱ्या गटात २६.८  टक्के लोक होते. प्रतिपिंड कमी वेगाने नष्ट होणाऱ्या गटात २९  टक्के लोक होते. त्यांच्या चाचण्या सकारात्मक होत्या पण त्यांचे प्रतिपिंड सहा महिने टिकले होते. प्रतिपिंडे टिकवून ठरणाऱ्या गटात ३१.७  टक्के लोक होते त्यात १८० दिवस प्रतिपिंडात परिणाम झाला नाही.

विलंबित प्रतिसाद गटात १.८  टक्के लोक होते त्यांच्यात विषाणूला मारक प्रतिपिंड जास्त काळ टिकले. प्रतिकारशक्ती जास्त काळ टिकवण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता या संशोधनाचा वापर करता येऊ शकतो.

अभ्यासानुसार ज्यांच्यात टी पेशी सहा महिने टिकल्या त्यांच्यात प्रतिकारशक्ती जास्त काळ टिकून राहिली. शोधनिबंधाचे लेखक डेव्हीड लाय यांच्या मते विषाणूवर मात करणाऱ्या प्रतिपिंडांचा त्यांनी अभ्यास केला व प्रतिपिंड टिकण्याचा काळ वेगवेगळ्या लोकात वेगवेगळा असू शकतो.