मिझोरम राज्याला सोमवारी पहाटे भूकंपाचा धक्का बसला. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नसून मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झाली असल्याची माहिती राज्यातील भूशास्त्र आणि खनिज संसाधान विभागाने दिली आहे.

भारत-म्यानमार सीमेजवळील चंपाई जिल्ह्य़ातील झोकावतार येथे केंद्र असलेल्या या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. हा भूकंप सोमवारी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी झाला, अशी माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली. या भूकंपामुळे चंपाई जिल्ह्य़ासह राजधानी ऐझॉल आणि इतर भागांतील इमारतींचे आणि घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले, तर राज्यातील अनेक महामार्गाना आणि रस्त्यांना तडे गेले आहेत.

भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची जिल्हा प्रशासन आणि स्थानिक आमदारांकडून पाहणी सुरू असून त्यानंतरच एकूण हानीची माहिती देता येईल, असे मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथंगा यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी झोरामथंगा यांच्याशी संपर्क साधून केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले. ईशान्य भारतातील बराच भाग  भूकंपप्रवण असून सोमवारी दुपारी नागालँडलाही भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.