इंडोनेशियाच्या जावा या मुख्य बेटावर आलेल्या भूकंपात किमान सहा जण  ठार झाले आणि अनेक इमारतींचे नुकसान झाले. बाली या प्रमुख पर्यटनस्थळालाही भूकंपाचा धक्का बसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, भूकंपानंतर सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.

रिश्टर स्केलवर ६ तीव्रतेच्या या भूकंपाने स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता या बेटाच्या दक्षिण किनाऱ्याला धडक दिल्याचे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने सांगितले. भूकंपाचे केंद्र मलंग जिल्ह्य़ाच्या सुंबरपुकुंग शहराच्या दक्षिणेला ४५ किलोमीटर अंतरावर आणि ८२ किलोमीटर खोलीवर होते.

समुद्राखाली झालेल्या भूकंपामध्ये सुनामी आणण्याची क्षमता नसल्याचे इंडोनेशियाच्या भूकंप व सुनामी केंद्राचे प्रमुख रहमत त्रियोनो यांनी एका निवेदनात सांगितले. मात्र, भूस्खलन घडवून आणू शकणाऱ्या मातीच्या किंवा दगडांच्या उतारापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.