हॉटेलमध्ये खाण्यासाठी किंवा किराणामाल आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तीला करोना संसर्ग होण्याचा धोका हा विमानप्रवास करणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक असतो, असा दावा हार्वर्ड विद्यापिठाने केला आहे. हार्वर्ड विद्यापिठामधील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

हार्वर्डमधील टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ विभागातील संशोधकांनी विमान प्रवासासंदर्भातील आरोग्य समस्यांबद्दल अभ्यास केला. या अभ्यासातील महत्वाचे मुद्दे आणि समोर आलेली माहिती ‘एव्हिएशन पब्लिक हेथ इनिशिएटिव्ह’ या अहवालामध्ये याच आठवड्यात प्रकाशित करण्यात आली आहे. या अभ्यासामध्ये विमानप्रवासादरम्यान प्रवाशांना योग्य काळजी घेण्यासंदर्भातील सूचना केल्यास करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी असते असं दिसून आलं आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सतत साबणाने हात धुणे, मास्क घालूनच घराबाहेर पडणे, विमानातील व्हेंटीलेशन सिस्टीमच्या माध्यमातून हवा खेळती ठेवणे, विमानाची नियमित साफसफाई आणि सॅनिटायझेनशन करणे यासारखे नियम सध्या पाळले जात आहेत. या नियमांचे योग्य पद्धतीने पालन केल्यास विमान प्रवासादरम्यान करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता ही इतर दैनंदिन कामांदरम्यान असणाऱ्या संसर्गाच्या शक्यतेपेक्षा कमी असते, असं या अहवालात म्हटलं आहे. करोना संसर्गाचा विचार करता योग्य पद्धतीने काळजी घेऊन केलेला विमानप्रवास हा दुकानामध्ये किराणामाल आणण्यासाठी किंवा हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा अधिक सुरक्षित असतो असं अभ्यासात म्हटलं आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यासंदर्भातील शिक्षण आणि माहितीचा प्रसार करणारंही जास्त फायद्याचं ठरतं असंही यात म्हटलं आहे. “विमानप्रवासादरम्यान करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काय करता येईल याबद्दल विमान कंपन्या आणि विमातळांवरील व्यवस्थापनाकडून प्रवाशांना वारंवार सूचना केल्या जात आहेत. विमानाचे तिकीट बुकिंग करताना, चेक-इन करताना, बोर्डिंगदरम्यान आणि विमानामध्येही यासंदर्भातील सूचना केल्या जात आहेत. तसेच विमान प्रवासादरम्यान एखादा संक्षयित रुग्ण आढळून आल्यास त्याला आयसोलेट कसे करावे आणि इतरांच्या सुरक्षेसाठी काय करावे यासंदर्भातील प्रशिक्षणही कॅबीन क्रुमधील सदस्यांना देण्यात आलं आहे,” असंही या अहवालात म्हटलं आहे.

जगभरातील करोनाबाधितांच्या संख्येने चाडेचार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. वर्ल्डमीटर या वेबसाईटनुसार करोनामुळे आतापर्यंत ११ लाख ८७ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या एक लाख २१ हजार इतकी असून करोनाबाधितांची संख्या ८० लाखांहून अधिक असल्याचे आरोग्यमंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटलं आहे.