फक्त दोन दिवसांच्या काळात एबोला विषाणूने ५६ जण दगावले असून या साथीने मरण पावलेल्यांचा जागतिक आकडा १ हजार ६९ वर पोहोचल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने  गुरुवारी दिली. तर १० लाख लोकांना या आजाराची बाधा झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.
आठवडय़ाच्या शेवटी मृतांच्या संख्येने एक हजाराचा आकडा पार केला. १० ते ११ ऑगस्ट या दोन दिवसांत मृतांची संख्या वेगाने वाढल्याचे संघटनेने स्पष्ट केले. परंतु पश्चिम आफ्रिकन देशांत इबोलाची लागण झालेल्यांची संख्या आणि मृतांच्या आकडय़ाची खात्रीशीर माहिती हाती न आल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून मृतांचा एकूण आकडा कमी सांगण्यात आला आहे.
 पश्चिम आफ्रिकेकडे जाणारी सर्व विमाने रद्द करण्यात आली असून गुनिआ येथील मृतांची संख्या ३७७ वर पोहोचली असल्याने ‘आरोग्यविषयक आणीबाणी’ जाहीर करण्यात आली आहे, परंतु येथील वैद्यकीय प्रशासनाला ही साथ आटोक्यात आणणारी प्रभावी लशीची प्रतीक्षा आहे. जोवर साथ नियंत्रणात येत नाही तोवर नागरिकांना एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करण्यास मनाई तसेच सीमा भागांत कडक तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत.
याच वेळी सर्व संशयित रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे, असे गुनिआचे अध्यक्ष अल्फा कोन्ड यांनी सांगितले.
*गेल्या दोन दिवसांत १२८ जणांना इबोला साथीची लागण
*आतापर्यंत लागण झालेल्याची संख्या १९७५
*आजवर नव्याने लागण झालेले आणि मृत पावलेले नागरिक पश्चिम आफ्रिकन देशातील.
*लायबेरियात ७१ जणांना लागण आणि ३२ जण दगावले.
*सिएरा लिओनमध्ये ५३ जणांना लागण १९ मृत्युमुखी
*वर्षांच्या सुरुवातीस जिथे लागण झाली त्या गुनिआ देशात चारजणांना नव्याने लागण आणि चारजणांचा मृत्यू. तर नायजेरियात एकाचा मृत्यू. मृतांची एकूण संख्या ३.  
लस जनावरांवर लागू
‘व्हीएसव्ही- इबोव’नामक लशीच्या ८०० ते १००० डोसचा प्रयोग जनावरांवर केल्यानंतर त्यांच्यात सकारात्मक बदल जाणवला आहे. परंतु तो मानवांवर करायचा की नाही, याबाबत खात्री झालेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून ही लस वाटण्यात आली आहे, असे कॅनडाच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
इबोलाचे काळे कृत्य कळाले
वॉशिंग्टन – इबोलाचा घातक विषाणू शरीरात गेल्यानंतर तो मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमता कशी नष्ट करतो, याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. या संशोधनामुळे इबोलाला नष्ट करणारी प्रभावी लस निर्माण करण्यास मदत होईल.
वॉशिंग्टन विद्यापीठाच्या औषधशास्त्र विभागातील डॉ. गया अमरसिंघे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा शोध लावला आहे. इबोलाचा ‘व्हीपी-२४’ हा विषाणू शरीरात गेल्यानंतर नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमता नष्ट करतो.