गुजरात निवडणुकीचा प्रचार संपला असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुलाखत प्रसारित केल्याबद्दल वृत्तवाहिन्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानेच तसे आदेश दिले आहेत.

ज्या वाहिन्यांनी ही मुलाखत वा तिचा अंश प्रसारित केला त्यांच्याविरुद्धही १२६(१)(ब) या कलमाखाली तक्रार नोंदवण्याची सूचना आयोगाने राज्य निवडणूक आयुक्तांना केली आहे. या वाहिन्यांनी मतदान संपेपर्यंत ही मुलाखत वा तिचा अंश प्रसारित करू नये, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काँग्रेसने भाजपच्या तक्रारीवरच टीका केली आहे. २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या दिवशीच मोदी यांनी मतदानाआधी भाजपचे निवडणूक चिन्ह उंचावून दाखवले होते. त्यांच्यावर आयोगाने काहीही कारवाई केली नाही. तसेच पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधीच मोदी आणि अन्य भाजप नेत्यांनी गुजरातमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा नोटिस पाठवायची वा कारवाई करायची तर प्रथम त्यांच्यावर करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केली. भाजप सरकार निवडणूक आयोगाचा वापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

देश माझ्यापेक्षा मोठा

ज्या मुलाखतीवरून गदारोळ उडाला आहे त्या मुलाखतीत प्रश्नकर्त्यांने राहुल यांना विचारले होते की, काँग्रेस अध्यक्ष म्हणून देशाची सेवा आपण कशी कराल? त्यावर राहुल म्हणाले की, ‘‘माझे आजोबा, माझी आजी, वडील आणि आई या सर्वानी देशाची सेवा केली आहे, पण आम्हा कुणाहीपेक्षा हा देश मोठा आहे. देशासमोर तुम्ही कुणीच नाही, ही भावना नसेल तर पक्षाध्यक्षपदही निर्थकच ठरेल.’’ तुमच्या या नव्या रूपाने मोदी यांना चिंता वाटत आहे का, असे विचारता राहुल म्हणाले, ‘‘माझी त्यांना भीती वाटत नाही. पण लोकांचे मत बदलत आहे, याचीच त्यांना भीती वाटत आहे.’’