देशाचा पैसा घेऊन पळालेल्या आर्थिक घोटाळेबाजांना भारतात आणू, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी लखनौमधील कार्यक्रमात दिली. आर्थिक घोटाळेबाजांची संपत्तीही जप्त केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

शुक्रवारी लखनौमध्ये रेल्वे प्रादेशिक प्रायमरी सहकारी बँकेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गृहमंत्री राजनाथ सिंह देखील सहभागी झाले होते. ते म्हणाले, इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते. पण माझ्यामते बँकेतील व्यवहार सहज-सोपे कसे करता येतील हे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. रेल्वे देशाची लाइफलाइन असून ज्या दिवशी रेल्वे ठप्प पडेल त्या दिवशी देशातील अनेक भागांमधील कामकाज ठप्प होईल, असे त्यांनी सांगितले.

आर्थिक घोटाळेबाजांविरोधात केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. ‘फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८’ हा कायदा अस्तित्वात आला असून मी देशातील जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही मेहनतीने कमावलेला पैसा परदेशात घेऊन पळालेल्यांना भारतात परतावंच लागेल. त्यांची संपत्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले. विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी या प्रकरणांवरुन काँग्रेसने भाजापवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त होते.

कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना राजनाथ सिंह यांनी सीबीआयच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसकडे जनहिताचे मुद्देच नसल्याने ती लोकं आता असे मुद्दे हातात घेत आहेत. त्यांनी चौकशी समितीचा अहवाल यायची वाट पाहायला हवी. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात आहे. काँगेस नेते जनतेच्या मुद्द्यासाठी कधीच रस्त्यावर उतरत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.