इजिप्तमध्ये पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत ४० कथित दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कैरो येथील गिझा पिरॅमिड भागात रस्त्याच्या बाजूला झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात व्हियतनामचे ३ पर्यटक आणि त्यांच्या गाईडचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाईला सुरूवात केली आहे.
गिझा प्रशासकीय हद्दीत आणि उत्तर सिनाई द्वीपकल्पात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात हे संशयित मारले गेले असे अंतर्गत मंत्रालयाने सांगितले. ३० दहशतवादी गिझातील छाप्यांमध्ये तर उर्वरित १० उत्तर सिनाईमधील छाप्यांमध्ये मारले गेल्याचे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, त्याचा थेट पर्यटकांच्या बसवरील हल्ल्याशी संबंध जोडण्यात आलेला नाही. हे संशयित देशाविरुद्ध, तसेच पर्यटक संस्था आणि चर्चवर अनेक हल्ला करण्याची तयारी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती, असा यात उल्लेख करण्यात आला आहे. दहशतवाद्यांचा एक गट विशेषतः आर्थिक संस्थांसह सरकारी संस्था, तसेच पर्यटन, सशस्त्र दले, पोलीस आणि ख्रिश्चनांची पूजास्थळे यांवर अनेक आक्रमक हल्ले करण्याची योजना आखत होते. या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, बॉम्ब तयार करण्याची सामुग्री जप्त केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 30, 2018 9:07 am