बांगला देशात अवामी लीगच्या आठ कार्यकर्त्यांना फाशी व इतर १३ जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. २०१२ मध्ये त्यांनी विरोधक पुरस्कर्त्यां बंदमध्ये एका शिंप्याला ठार केले होते.
लवाद-४ चे न्यायाधीश एबीएम निझामउल हक यांनी भरगच्च न्यायालयात आठ जणांना फाशीची शिक्षा ठोठावली. यातील सहा आरोपी या वेळी उपस्थित होते. इतर दोन आरोपी उपस्थित नव्हते. ज्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली, त्या १३ पैकी ११ जण उपस्थित नव्हते. बांगलादेशी कायद्यानुसार आरोपींनी अपील केले नाही, तरी उच्च न्यायालयाने त्याचे पुनर्विलोकन करणे गरजेचे आहे. छात्र लीगच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी नऊ डिसेंबरला जुन्या ढाक्यातील बहादूर शहा पार्क भागातील विश्वजित दास या २४ वर्षीय शिंप्याला ठार केले होते. बांगलादेश छात्र लीग ही अवामी लीगची विद्यार्थी संघटना असून सूत्रापूर पोलिसांनी याबाबत त्याच दिवशी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. २ जून रोजी छात्र लीगच्या २१ कार्यकर्त्यांवर आरोप निश्चित करण्यात आले.  
त्या वेळी अवामी लीगने त्याची फार गंभीर दखल घेतली नव्हती. या निकालावर प्रतिक्रिया देताना दास यांच्या भावाने सांगितले, की आपण समाधानी आहोत व आम्हाला न्याय मिळाला आहे.