येथे एका सत्तर वर्षे वयाच्या बौद्ध धर्मगुरूची आग्नेय बांगलादेशातील एका मठात क्रूरपणे हत्या करण्यात आली. मुस्लिम बहुल असलेल्या बांगलादेशात अनेक धर्मनिरपेक्ष कार्यकर्ते, ब्लॉगर व अल्पसंख्याकांची आतापर्यंत हत्या झाली आहे. बंदरबन हिल जिल्हय़ातील नाईखंगाचारी भागातील मठाचे प्रमुख माँग शोई वू हे सकाळी एका बौद्ध भिख्खूला मृतावस्थेत सापडले. तो त्यांना न्याहारी देण्यासाठी गेला असता त्यांची हत्या झाल्याचे पहिल्यांदा त्याच्या निदर्शनास आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. नाइखंगाचारी पोलीस स्टेशनचे प्रमुख काझी अहसान यांनी फोनवर सांगितले, की हल्लेखोरांनी बौद्ध धर्मगुरूचा गळा चिरला व मध्यरात्रीनंतर हा धर्मगुरू मठात एकटाच असताना त्याची हत्या झाली असावी. मुस्लीम सूफी धर्मोपदेशकाचा अलीकडेच खून झाला होता. त्याला वायव्य राजशाही शहरात कोयत्याने वार करून ठार करण्यात आले होते. आता बौद्ध धर्मगुरूच्या हत्येची जबाबदारी कुणी घेतली नसून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हल्लेखोरांना शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. हा बौद्ध मठ दूरस्थ भागात असून माँग शोई वू हे तेथे एकटे राहात होते. बांगलादेशात गेल्या काही आठवडय़ांत अल्पसंख्याकांवर पद्धतशीर हल्ले चालू असून अल्पसंख्याक, ब्लॉगर, बुद्धिमंत व परदेशी लोक यांना लक्ष्य केले जात आहे. अलीकडच्या एका हल्ल्यात उदारमतवादी प्राध्यापकाला गेल्या महिन्यात कोयत्याने वार करून राजशाही येथे ठार करण्यात आले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी बांगलादेशातील समलैंगिकताविषयक मासिकाच्या संपादकांना ढाका येथील सदनिकेत त्यांच्या मित्रासह ठार करण्यात आले होते. ३० एप्रिलला हिंदू शिंप्याला आयसिसच्या दहशतवाद्यांनी त्याच्या दुकानातच कोयत्याचे वार करून ठार केल्याची घटना मध्य बांगलादेशात घडली होती.