पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये भाजपाला हादरा बसला असतानाच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘समझदार को इशारा काफी है’, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपाला आत्मचिंतनाचा सल्ला देखील दिला आहे.

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी मंगळवारी झाली असून या निवडणुकांमध्ये भाजपाला हादरा बसला आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरु असून छत्तीसगडमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. राजस्थानमध्येही भाजपा पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. अद्याप अंतिम निकाल लागलेला नसला तरी पहिल्या चार तासांमधील कल पाहता तीन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येईल असे दिसते.

दिल्लीत मंगळवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून संसदेबाहेर संजय राऊत यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘निकालातून स्पष्ट संदेश मिळतोय’, असे त्यांनी सांगितले. यावर पत्रकारांनी त्यांना ‘कोणासाठी संदेश?’ असा प्रश्न विचारला. यावर संजय राऊत म्हणाले, समझदार को इशारा काफी है. आत्मचिंतनाची गरज आहे.  मोदी सरकारला उद्देशून त्यांनी हे विधान केले.

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले, २०१९ मध्ये भाजपामुक्त भारताची ही सुरुवात आहे. तर काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी निकालावर समाधान व्यक्त केले. ‘निकाल चांगला लागला आहे. जनता विरुद्ध नरेंद्र मोदी अशी ही लढत होती. ही फक्त सुरुवात असून खरी लढत आता पुढे आहे. या लढतीसाठी राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्ष तयार आहेत’, असे त्यांनी सांगितले.