लोकसभेसाठीच्या मतदानाला काही तासाचा अवधी बाकी असताना निवडणूक आयोगाने येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल येथून निवडणूक लढवत आहेत. आयोगाने ही कारवाई केल्याने येथील वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाराणसी शहरातील गुलाबाग परिसरातील भाजपाच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. शहरातील प्रचार संपल्यावरही हे साहित्य वाटण्याचा भाजपाचा प्रयत्न होता, असे आयोगाच्या अधिका-यांनी सांगितले. या छाप्यामध्ये बिल्ले, टी शर्ट्स, प्रचारपत्रके जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेली पत्रके आणि टी शर्ट्स वाटप करण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा हेतू असल्यामुळे छापा टाकण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  मात्र या छाप्यामध्ये जप्त करण्यात आलेले साहित्य प्रचारासाठी वापरण्यात आले नसून ते शिल्लक राहिले असल्याची भाजप नेते व कार्यकर्त्यांनी सांगितले.  
वाराणसीमध्ये तब्बल १६ लाख मतदार  सोमवारी मतदानाच हक्क बजावणार असून, या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने टाकलेला हा छापा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोग कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.