श्रीरंग बारणे, पार्थ पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल

राजकीय उलथापालथ आणि चुरशीच्या लढतीमुळे चर्चेत आलेल्या मावळ लोकसभा मतदार संघातील प्रमुख उमेदवार शिवसेना-भाजप युतीचे श्रीरंग बारणे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे पार्थ पवार यांनी मंगळवारी एकाच दिवशी निगडी-प्राधिकरणात उमेदवारी अर्ज दाखल केले. या निमित्ताने दोन्ही उमेदवारांनी रणरणत्या उन्हातही जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील इमारतीत मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. चिंचवड वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे एकत्र येत राष्ट्रवादीने पार्थ यांच्या रॅलीला सुरुवात केली. पार्थ यांच्यासमवेत त्यांचे बंधू जय पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतंत्र रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधला. या वेळी अण्णा बनसोडे, बापू भेगडे, प्रदीप गारटकर त्यांच्यासमवेत होते. त्यानंतर, पवार हे शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा अर्ज भरण्यासाठी पुण्याला रवाना झाले. दुपारी साडेबाराच्या सुमारास पार्थ यांचा अर्ज दाखल करण्यात आला. शेकापचे नेते बाळाराम पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे आदी त्यांच्यासोबत होते.

श्रीरंग बारणे यांच्या रॅलीला आकुर्डी खंडोबा माळ येथून प्रारंभ करण्यात आला. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अमर साबळे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, शरद सोनवणे, प्रशांत ठाकूर, डॉ. नीलम गोऱ्हे आदींच्या उपस्थितीत बारणे यांचा अर्ज भरण्यात आला.

बारणे यांच्यासह राज्यात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पार्थ पवार आणि बारणे यांची प्राधिकरण कार्यालयात समोरासमोर भेट झाली. तेव्हा पार्थ आणि बारणे यांनी हस्तांदोलन करत परस्परांना शुभेच्छा दिला. अर्ज भरण्याच्या निमित्ताने दोन्हीही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मंगळवारी दाखल झालेल्या १७ अर्जासह मावळ लोकसभेच्या रिंगणात ३२ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत.