बिहारनंतर सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाची शक्तिपरीक्षा पाहणाऱ्या चार राज्यांतील आणि एक केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची घोषणा शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. आसाममध्ये दोन टप्प्यांत, पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यांत, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दूचेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. १९ मे रोजी सर्व ठिकाणी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आसाम
पहिल्या टप्प्यात मतदान – ४ एप्रिल
दुसरा टप्पा मतदान – ११ एप्रिल
पश्चिम बंगाल
पहिला टप्पा मतदान – ४ एप्रिल आणि ११ एप्रिल
दुसरा टप्पा मतदान – १७ एप्रिल
तिसरा टप्पा मतदान – २१ एप्रिल
चौथा टप्पा मतदान – २५ एप्रिल
पाचवा टप्पा मतदान – ३० एप्रिल
सहावा टप्पा मतदान – ५ मे
केरळ
एकाच टप्प्यात मतदान – १६ मे
तामिळनाडू
एकाच टप्प्यात मतदान – १६ मे
पुद्दूचेरी
एकाच टप्प्यात मतदान – १६ मे
सर्व ठिकाणी मतमोजणी – १९ मे
निवडणूक काळात पेड न्यूजचा प्रकार रोखण्यासाठी आणखी सक्षम यंत्रणा उभारण्यात आली असल्याचे सांगून नसीम झैदी म्हणाले, या वेळी निवडणूक निरीक्षकांसोबत केंद्रीय पोलिसांचे पथक असणार असून त्या गाडीमध्ये जीपीएस यंत्रणाही बसविण्यात येणार आहे. निवडणूक निरीक्षकांवर निवडणूक आयोगाला लक्ष ठेवता यावे, यासाठी जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांच्या मदतीसाठी तंत्रज्ञानाचा आणि मोबाईलचा मोठा वापर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.