डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन व विकास संस्थेने एम्ब्रेयर विमानांच्या खरेदीसाठी केलेल्या २०८ दशलक्ष डॉलर्सच्या करारात दलाली दिली गेल्याच्या आरोपाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाने दिले आहेत. ब्राझीलच्या कंपनीशी यूपीएच्या राजवटीत २००८ मध्ये विमाने खरेदीचा करार झाला होता.

सरकारी सूत्रांनी सांगितले, की या विमान खरेदीत दलाली दिली गेल्याचे आरोप गंभीर स्वरूपाचे असून, त्याची सीबीआय म्हणजे गुन्हे अन्वेषण खात्याकडून चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे.

संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी असे सांगितले होते, की एम्ब्रेयर विमानांच्या खरेदीत काही गुन्हेगारी भाग असेल तर त्याची सीबीआय चौकशी करण्यात येईल. जर प्रक्रियात्मक बाबतीत काही चुका झाल्या असतील तर त्याची अंतर्गत चौकशी संरक्षण मंत्रालय करील असेही त्यांनी सांगितले होते.

यूपीए राजवटीत तीन एम्ब्रेयर विमाने खरेदी करण्याचा करार झाला होता, पण त्यात दलाली दिली गेल्याचे अमेरिकेने केलेल्या ब्राझीलच्या या कंपनीच्या व्यवहारांच्या चौकशीत निष्पन्न झाले होते. अमेरिकी न्याय खात्याने केलेल्या चौकशीत हे भारत, सौदी अरेबियात कंपनीने दलाली दिल्याचे निष्पन्न झाले होते. सुरक्षा कंत्राटासाठी दलाली देण्यात आली होती.

डीआरडीओने या प्रकरणी ब्राझीलच्या कंपनीकडून अहवाल मागवला होता त्यात असे म्हटले होते, की गेल्या पाच वर्षांतील दलालीच्या आरोपांची आम्ही चौकशी करीत आहोत. २००८ मध्ये एम्ब्रेयर विमानांच्या खरेदीचा हा करार झाला होता व डीआरडीओसाठी एअरबोर्न अर्ली वॉर्निग अँड कंट्रोल सिस्टीमने सुसज्ज असलेली तीन विमाने खरेदी करण्यात आली होती.