अध्र्यावर शाळा सुटलेल्यांसह बेरोजगार युवकांना अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तीन वर्षांत अशा एकूण १० लाख जणांना तंत्रकौशल्याचे प्रशिक्षण दिले जाईल, असे मनुष्यबळ खात्याने म्हटले आहे. पीएमकेव्हीवाय टेक्निकल इन्स्टिटय़ूशन्स प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत स्थापन करण्यात येणार आहेत. २०१६-१७ या वर्षांत २५०० महाविद्यालयांतून असे प्रशिक्षण दिले जाणार असून, सुरुवातीला प्रत्येकी १०० जणांना प्रशिक्षण दिले जाईल. महाविद्यालयाचा नेहमीचा कालावधी सोडून इतर वेळात तरुणांना रोजगार प्रशिक्षण देण्याची सुविधा तांत्रिक संस्थांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.

नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क या योजनेत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे, त्यातून तरुणांना स्वयंरोजगाराची संधी मिळेल. या योजनेसाठी केंद्राकडून निधी दिला जाणार असून, त्यात प्रशिक्षण खर्चाचा समावेश आहे. अभियांत्रिकी महाविद्यालये व अखिल तंत्रशिक्षण मंडळ म्हणजे एआयसीटीइच्या अखत्यारीतील संस्था व बहुतंत्रनिकेतन संस्था यात काम करणार आहेत.