भारतातील शेतकरी आंदोलनादरम्यान अमेरिकन खासदारांनी भारताला सल्ला दिला आहे की, भारतानं लोकशाहीच्या मानकांना सुरक्षित ठेवावं. केंद्र सरकारने इंटरनेट सेवा बंद न करता आंदोलनकर्त्यांना शांततेत निषेध आंदोलन करु द्यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

युएस डेमोक्रेटिक काँग्रेसचे नेते आणि इंडिया कॉकसचे उपाध्यक्ष ब्रॅड शेरमन म्हणाले, “मी भारत सरकारला आवाहन केलं आहे की, भारतानं लोकशाही मानकांना सुरक्षित ठेवावं तसेच आंदोलनकर्त्यांना शांततेत आंदोलन करु दिलं जावं. या आंदोलनकर्त्यांना आणि पत्रकारांना इंटरनेट सेवा वापरण्याची सुविधा द्यावी. भारताचे सर्व मित्र आशा करतात की आंदोलनातील सर्व पक्षांची लवकरच सहमती व्हावी.”

आणखी वाचा- …तर मग तसा कायदा बनवा; शेतकरी नेत्यांचे पंतप्रधानांना आव्हान

अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी ट्विटद्वारे म्हटलं की, ‘हाऊस कॉकस ऑन इंडिया’ आणि ‘इंडियन्स अमेरिकन्स फॉर दि ११७’ या संघटनांमध्ये विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. भारत-अमेरिकेमधील नात्यांना मजबूत करण्याच्या हेतूने काम करण्यासाठी आम्ही पुढे जात राहू. दरम्यान, द इंडियन एक्सप्रेसला सुत्रांनी सांगितलं की, अमेरिकेच्या खासदारांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दाही समाविष्ट होता.

दरम्यान, शेतकरी आंदोलनस्थळी इंटरनेट सुविधा बंद केल्याने चार फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या प्रशासनाने यावर टिपण्णी केली होती. माहितीची सहज पोहोच होणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. अमेरिकन खासदारांची ही टिपण्णी २०१९ च्या शेवटच्या महिन्यात कृषी कायद्यांविरोधात सुरु झालेल्या या आंदोलनानंतर पहिल्यांदाच आली आहे.