राजस्थान काँग्रेसमधील दोन मोठया नेत्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मध्य प्रदेश पाठोपाठ राजस्थानमध्येही काँग्रेसला सत्ता गमवावी लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी टि्वटकरुन काँग्रेसवर निशाणा साधताना जुने सहकारी सचिन पायलट यांचे समर्थन केले आहे.

यावर्षी मार्च महिन्यात ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. “सचिन पायलट यांनाही पक्षात बाजूला करण्यात आले असून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत त्यांना त्रास देत आहेत. हे पाहून वाईट वाटते” असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. पुढे त्यांनी ‘प्रतिभा आणि क्षमता यांना काँग्रेसमध्ये फार कमी वाव मिळतो हे दिसते’ असे  म्हटले आहे.

तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांना मानणारे आमदारही पक्षातून बाहेर पडले आणि मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार कोसळले. आता राजस्थानही त्याचे दिशेने चालल्याचे दिसत आहे. दरम्यान उद्या सकाळी १०.३० वाजता अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यावेळी नेमके चित्र स्पष्ट होऊ शकते.