आरोग्याला घातक असल्याचा दावा करत हापूसला अटकाव करणाऱ्या युरोपीय समुदायाने पुन्हा एकदा हापूसला युरोपात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. हापूसबरोबरच चार भाज्यांनाही युरोपात जाण्याचा मान पुन्हा एकदा मिळणार आहे. २८ देशांच्या युरोपीय समुदायाने यंदा एप्रिलमध्ये एकमुखाने ठराव करत हापूस व चार भाज्यांना युरोपाची दारे बंद केली होती.
भारतातून आयात होणारा आंबा तसेच भाज्या आरोग्याला घातक असल्याचे स्पष्ट करत युरोपीय समुदायाने बंदी घातली होती. त्यावर बराच वादंग निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर युरोपीय समुदाच्या अन्न व पशुपालन विभागाचे (एफव्हीओ) पथक अलीकडेच भारतात येऊन गेले. त्यांनी हापूस निर्यात केंद्रांची पाहणी केली. या केंद्रांच्या दर्जा व एकंदरच कार्यपद्धतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केल्याने हापूसला पुन्हा एकदा युरोपात प्रवेश मिळण्याची सुचिन्हे आहेत, असे भारतीय निर्यात निरीक्षण परिषदेचे संचालक एस. के. सक्सेना यांनी सांगितले.  आंब्याच्या युरोपप्रवेशाच्या निश्चितीला कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) दुजोरा दिला आहे. युरोपीय समुदायाच्या पथकाने निर्यात केंद्रांची पाहणी केली तसेच त्याबद्दल समाधान व्यक्त करताना समुदायातील इतर देशांनाही त्याच्या दर्जाबाबत आश्वस्त करण्याची हमी दिल्याचे ‘अपेडा’तर्फे सांगण्यात आले.

युरोपातील हापूसनिर्यात
* २०१२-२०१३
तीन हजार ८९० टन
* २०१३-२०१४
तीन हजार ९३३ टन