समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढले तरीही भारतीय जनता पक्षाला विजयापासून रोखू शकत नाही, असं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सप-बसप यांच्यात युती झाली तरी भाजपाला विजयापासून ते रोखू शकत नाही असं मौर्य म्हणाले.

पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेस, सप आणि बसप यांसह सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची तयारी करत आहेत, असा दावा मौर्य यांनी केला. पंतप्रधान मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका घेऊन इतर पक्ष एकत्र येण्याची तयारी करत आहेत, मात्र भाजपाला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, भाजपा स्पष्ट बहुमत मिळवेल असं ते म्हणाले.

सर्वांच्या विकासावर भाजपाचा विश्वास आहे, पण सप-बसप सारखे पक्ष केवळ काही ठरावीक जणांच्या विकासाचा विचार करतात. ‘सबका साथ , सबका विकास’ हा भाजपाचा नारा आहे, पण ‘कुछ का साथ , कुछ का विकास ’ हा त्यांचा नारा आहे, असं मौर्य म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाचा झपाट्याने विकास होतोय, तर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात पायाभूत सुविधांचा विकास होतोय असंही मौर्य म्हणाले.