अभूतपूर्व मताधिक्याने जिंकून आल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचा ‘फायर ब्रॅंड’ नेता अशी त्यांची ओळख आहे. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदार संघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. १९९८ ला वयाच्या २६ व्या वर्षी ते लोकसभेवर निवडून गेले होते. तेव्हापासून ते २०१४ पर्यंत ते सातत्याने निवडून आले आहेत. १९९८ ला ते लोकसभेतील सर्वात कमी वयाचे खासदार होते.  उत्तराखंड मधील गढवाल या भागात त्यांचा जन्म ५ जून १९७२ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव अजय सिंह आहे.

प्राथमिक पासून पदवी पर्यंतचे शिक्षण त्यांनी त्यांच्याच राज्यात घेतले. गढवाल विद्यापीठातून त्यांनी बीएस्सीची पदवी मिळवली आहे. पदवी झाल्यानंतर त्यांना संन्यास घेण्याची इच्छा झाली. नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊन ते संन्यासी झाले.  गोरखपूरच्या गोरखनाथ मठामध्ये ते राहू लागले. त्यांचे गुरू अवैद्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ते साधना करू लागले. तसेच राजकीय कार्यातही ते रस घेऊ लागले. हिंदू वाहिनी नावाची संस्था उभारुन त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा त्यांनी विस्तार केला. १९९८ ला भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. २०१४ साली महंत अवैद्यनाथ यांचे निधन झाल्यानंतर ते मठाधीश झाले.

योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दंगे पसरवणे, हत्येचा प्रयत्न, हत्यार बाळगणे, चिथावणी देणे, धमकी देणे अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे. २००५ मध्ये त्यांनी शुद्धीकरण नावाची चळवळ सुरू केली होती. जे हिंदू ख्रिश्चन धर्मात गेले आहेत परंतु त्यांना परत येण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी त्यांनी ही शुद्धीकरणाची चळवळ सुरू केली होती. या चळवळीमध्ये १,८०० ख्रिश्चनांचे शुद्धीकरण करण्यात आले होते असा दावा त्यांना केला होता.  त्यानंतर त्यांनी पुन्हा घरवापसी ही चळवळ सुरू केली.

बळजबरीने मुस्लिम धर्मात गेलेल्या व्यक्तींना आम्ही पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देत आहोत असे स्पष्टीकरण त्यांनी या चळवळीबाबत दिले होते. जे लोक योगाला विरोध करतात त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. त्यांना बुडवले पाहिजे असे ते म्हणाले होते.  २००७ मध्ये एका मोहर्रमच्या मिरवणुकीदरम्यान हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद झाला आणि त्याचे रुपांतर संघर्षात झाले. त्यावेळी त्यांनी चिथावणी दिली होती असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर परिस्थिती अधिकच चिघळली. त्यांच्या समर्थकांनी गोरखपूर एक्सप्रेसचे डबे जाळल्याचाही आरोप झाला होता. अयोध्येमध्ये राम मंदिराचा निर्माण व्हावा यासाठी ते गेली कित्येक वर्षे प्रयत्न करत आहेत.