सीबीआयचे माजी हंगामी संचालक नागेश्वर राव यांनी सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी मागितली आहे. सीबीआयचे हंगामी संचालक असताना बिहारमधील मुझफ्फरपूर वसतीगृहातील लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी ए.के.शर्मा यांची बदली करणं ही आपली चूक होती असं राव यांनी स्वीकारलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता असंही राव यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
Former Interim CBI Chief M Nageshwar Rao files an affidavit rendering an unconditional apology to the Supreme Court: I admit that in view of the orders dated 31.10.2018 & 28.11.2018 passed by SC earlier… (1/2)
— ANI (@ANI) February 11, 2019
‘मी माझी चूक स्वीकारतो आणि सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागतो. मात्र, जाणूनबुजून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करण्याचा हेतू नव्हता, न्यायालयाचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही’, असं राव यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं असून माफीनामा स्वीकारण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.
मुझफ्फरपूर जिल्ह्यातील वसतीगृहात राहणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार गेल्या वर्षी समोर आला होता. या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची बदली करु नये, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने यापूर्वी झालेल्या सुनावणीत दिले होते. मात्र, यानंतरही या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सात फेब्रुवारीच्या सुनावणीत सीबीआयला फटकारलं होतं. ए. के.शर्मा यांच्या बदलीसाठी कारणीभूत कोण, असा सवाल कोर्टाने विचारला असता नागेश्वर राव हे संचालकपदी असताना हा निर्णय घेण्यात आला होता, असे सीबीआयच्या वकिलांनी सांगितले होते. यावर सुप्रीम कोर्टाने ‘आता फक्त देवच तुमची मदत करु शकतो’, असे सांगत सुप्रीम कोर्टाने नागेश्वर राव यांना नोटीस बजावून नोटीस बजावून 12 फेब्रुवारी म्हणजे आजच्या सुनावणीसाठी स्वतः न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याच्या एक दिवस आधीच अर्थात दि.11 रोजी राव यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली आहे.
