इंधनावरील एक्साइज ड्युटी केंद्र सरकारकडून १ रुपया ५० पैसे कमी करण्यात आली आहे, तर ओएमसी अर्थात तेल कंपन्यांकडून  १ रुपया कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील ग्राहकांना पेट्रोल प्रति लिटर अडीच रुपयांनी स्वस्त मिळणार, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आम्ही तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी करतो आहोत असेही जेटली यांनी स्पष्ट केले.

केंद्राने जसा लिटरमागे अडीच रुपयाचा दिलासा दिला तसाच दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने लिटरमागे अडीच रुपयांची कपात करावी. म्हणजेच पेट्रोलवरचा व्हॅट राज्य सरकारांनी कमी आकारावा म्हणजे ग्राहकांना लिटरमागे पाच रुपयांचा दिलासा त्वरित मिळेल. यासंदर्भात आम्ही देशातील सगळ्या राज्यांशी चर्चा करणार आहोत त्यांनी त्वरित यासंदर्भात घोषणा करावी असे आवाहन आम्ही करणार आहोत. जेणेकरून ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे पाच रुपयांची सूट मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने इंधन दर वाढले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिली.

या निर्णयामुळे केंद्र सरकारला उत्पादन शुल्कात १० हजार ५०० कोटींचा तोटा होणार असल्याचेही जेटली यांनी यावेळी जाहीर केले. इंधन दरांवरची एक्साइज ड्युटी अर्थात उत्पादन शुल्कात १ रुपया ५० पैशांची कपात केल्याने हा तोटा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अडीच रुपयांची कपात ही तातडीच्या बदलांसह आजपासूनच लागू करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारवर टीकेची झोड उठते आहे. विरोधकांनी सप्टेंबर महिन्यात वाढत्या इंधन दरांविरोधात संपही पुकारला होता. त्यावेळी पत्रकार परिषद घेत रविशंकर प्रसाद यांनी इंधन दरवाढ केंद्र सरकार रोखू शकत नाही असे म्हटले होते. संपाच्या दिवशीच त्यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर आणि केंद्र सरकारवर टीका झाली होती. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलने नव्वदी पार केली तर डिझेलने ऐंशी रुपये प्रति लिटरचा आकडा पार केला. अशात आता केंद्र सरकारने सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी दीड रुपया एक्ससाइज ड्युटी कमी करण्याचा आणि तेल कंपन्यांनी १ रुपयाची कपात केल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेल आज पासून प्रति लिटर अडीच रुपयांनी स्वस्त होणार आहे.