कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी त्यांच्या १७ महिने जुन्या मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार केला. ७ नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून, उत्पादन शुल्कमंत्री एच. नागेश यांना हटवण्यात आले आहे.

विधानसभेचे आमदार असलेले उमेश कट्टी, एस. अंगारा, मुरुगेश निरानी व अरविंद लिंबावली आणि विधान परिषदेतील आमदार असलेले आर. शंकर, एमटीबी नागराज व सी.पी. योगेश्वर अशी नव्या मंत्र्यांची नावे आहेत.

राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल वजुभाई वाला यांनी मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, भाजपचे सरचिटणीस व कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंह व प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्यासह भाजप नेते व पदाधिकारी, राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी या वेळी हजर होते.

काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीतील १७ आमदारांच्या बंडामुळे ते सरकार कोसळल्यानंतर जुलै २०१९ मध्ये येडियुरप्पा यांनी पदभार स्वीकारला. तेव्हापासून मंत्रिमंडळाचा हा तिसरा विस्तार आहे. यात जुने मंत्री, तसेच काँग्रेस व जद (एस) मधून आलेले बंडखोर आमदार यांची संमिश्र भरती आहे.

भाजपला सत्तेवर येण्यास मदत करणाऱ्या बंडखोरांना दिलेले आश्वासन राखत काँग्रेस-जद (एस) मधून भाजपमध्ये आलेले आर. शंकर व एमटीबी नागराज यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. २०१९ साली राज्यात झालेल्या गोंधळात बंडखोर आमदारांना सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले विधान परिषदेतील आमदार योगेश्वर यांनाही मंत्रिपदाचे बक्षीस देण्यात आले आहे. यापूर्वीच्या भाजप मंत्रिमंडळातही ते मंत्री होते.

भाजपमध्ये असंतोष

या विस्तारामुळे भाजपमध्ये असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. लोकांनी निवडून न दिलेल्या विधान परिषदेच्या सदस्यांना मंत्री बनवण्यात आल्याबद्दल काही आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. बहुतांश मंत्री बंगळूरु व बेळगाव जिल्ह्य़ांतीलच असून त्यामुळे सर्व भागांना प्रतिनिधित्व मिळालेले नाही, तसेच आपल्या ‘ज्येष्ठतेचा किंवा त्यागाचा’ विचार झाला नाही, अशी तक्रार त्यांनी केली आहे.