उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला धमकावल्याप्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर याला दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र, सेंगरने या शिक्षेविरोधात बुधवारी दिल्ली हायकोर्टात धाव घेऊन आव्हान याचिका दाखल केली आहे.

दिल्लीचे कनिष्ठ न्यायालय असलेल्या तीन हजारी कोर्टाने सेंगरला बलात्कारप्रकरणात दोषी ठरवत मरेपर्यंत तुरुंगात ठेवण्याची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर २५ लाख रुपयांचा दंडही त्याला ठोठावला होता. एका महिन्यामध्ये सेंगरला हा दंड भरायचा आहे.

दरम्यान, तीस हजारी कोर्टात शिक्षा कमी करण्याची विनंती सेंगरने केली होती. मात्र, यावर न्या. धर्मेश शर्मा यांनी म्हटले की, सेंगरने जे काही केले आहे ते त्याने मुलीला घाबरवण्यासाठी आणि धमकावण्यासाठी केलं आहे. यामध्ये आम्हाला शिक्षेत सूट देण्यासारखी कुठलीही परिस्थिती आढळलेली नाही. सेंगर हा लोकप्रतिनिधी होता त्याने लोकांचा विश्वासघात केला. त्यामुळे त्याला शिक्षेमध्ये कुठलीही सूट मिळणार नाही. त्याचबरोबर पीडित मुलीच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची अतिरिक्त नुकसान भरपाई देण्याचे आदेशही कोर्टाने दिले होते.

त्याचबरोबर कोर्टाने आदेशात सीबीआयला निर्देश दिले होते की, पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबांच्या सदस्यांच्या जीविताला धोका नाही ना तसेच त्यांच्या सुरक्षेचा आढावा प्रत्येक तीन महिन्यांनी घ्यावा.