News Flash

तिसरी लाट  थोपवणे शक्य!

जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण गरजेचे आहे. कारण रुग्णांची संख्या पुन्हा वाढू शकते.

केंद्राचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार राघवन यांचे स्पष्टीकरण

देशात करोना साथीची तिसरी लाट अटळ असल्याच्या विधानावर माघार घेत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी, शुक्रवारी ‘योग्य त्या उपाययोजना केल्यास तिसरी लाट थोपवता येईल’, असे सांगितले.

देशात करोनाची तिसरी लाट अटळ आहे, असे विधान राघवन यांनी बुधवारी केले होते. त्यावर स्पष्टीकरण करताना विजय राघवन म्हणाले, ‘‘जर पुरेशा उपाययोजना केल्या तर देशात तिसरी लाट सर्वत्र येणार नाही. कुठल्याही साथीमध्ये चढउतार असतात. जर सहजपणे रोगाचा संसर्ग होऊ शकेल, अशा लोकांची संख्या जास्त असेल तरच लाटेची परिस्थिती निर्माण होते.’’ साथीच्या लाटा किंवा त्यांची संख्या, रुग्णांची संख्या याबाबत बोलण्यापेक्षा आपण आता संसर्गाची ठिकाणे, वेळ आणि तीव्रता याविषयी चर्चा करणे आवश्यक आहे. जर योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, तर कुठेच करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही, असे राघवन यांनी स्पष्ट केले.विषाणूचा संसर्ग अनेकांना होऊ शकतो, हे सर्वांना ज्ञात आहे. जेव्हा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केला नाही तर संसर्गाला बळी पडू, असेही ते म्हणाले.

जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण गरजेचे आहे. कारण रुग्णांची संख्या पुन्हा वाढू शकते. लोक जर आत्मसंतुष्ट राहिले आणि त्यांनी नियम पाळले नाहीत तर पुन्हा संसर्गाची शक्यता वाढते. जर लोकांनी लाट ओसरलीं, असे समजून उपायांकडे दुर्लक्ष केले तर धोका आहे, पण जर आपण विषाणूला संधीच दिली नाही तर तो नष्ट होईल. विषाणूच्या लाटांचे चढउतार आपण नियंत्रित करू शकतो. त्यासाठी मुखपट्टी, सामाजिक अंतर, साबणाने हात धुणे आणि लसीकरण यांसारखे मार्ग आहेत.

करोनाची तिसरी लाट अटळ असून या विषाणूचे अनेक प्रकार आहेत. तिसरी लाट केव्हा येईल हे सांगता येणार नाही, पण लोकांमध्ये आता प्रतिकारशक्तीही निर्माण होत आहे. विषाणू लोकांना संसर्ग करण्यासाठी नवे मार्ग शोधत आहे, असे राघवन यांनी बुधवारी म्हटले होते.

बदलापुरात आठ दिवस कठोर टाळेबंदी

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात आज, शनिवार ८ मे सकाळी ७ वाजल्यापासून १५ मेपर्यंत सकाळी ७ पर्यंत आठ दिवस कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी सायंकाळी त्याबाबतचे निर्देश जारी केले. नगरपालिका क्षेत्रातील किराणा, भाजीपाला, फळे, दूध, बेकरी, मिठाईसह सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांची दुकाने बंद राहतील. जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा मात्र सुरू असेल. दवाखाने आणि बँकाही सुरू राहतील. टाळेबंदीच्या भीतीने शुक्रवारी नागरिकांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

कर्नाटकला दररोज ९६५ मेट्रिक टनऐवजी १२०० मेट्रिक टन प्राणवायू उपलब्ध करून देण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. आम्ही कर्नाटकातील नागरिकांना संकटात टाकू शकत नाही. उच्च न्यायालयाने परिपूर्ण, विचारपूर्वक आणि न्यायिक अधिकारांचा वापर करून निर्णय दिला आहे, असे न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शहा यांच्या पीठाने केंद्राला सुनावले. तसेच दिल्लीला प्राणवायूचा पुरवठा करण्याच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा, आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका, असा इशाराही केंद्राला दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 1:36 am

Web Title: explanation by raghavan chief scientific adviser of the center government corona third wave akp 94
टॅग : Corona
Next Stories
1 रशियाच्या एकमात्रा लशीस मान्यता
2 दिल्लीसाठी प्राणवायुपुरवठ्याचे  सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश
3 बौद्धिक संपदा हक्कमाफीचे अमेरिकेत स्वागत
Just Now!
X