मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीवर त्याच्या वारसदारांचा हक्क मानला जातो अथवा मृत्यूपत्रानुसार संबंधिताला ते सर्व हक्क देण्यात येतात. मात्र, ही व्यक्ती वापरत असलेल्या ‘सोशल मिडियावरील अकाउंट’चे काय, असा प्रश्न सर्वानाच पडतो. सोशल मिडियाचाच एक भाग असलेल्या फेसबुकने मात्र आता त्यावरही उपाय शोधला आहे. फेसबुक वापरणाऱ्यांना त्यांच्या फेसबुक खात्याचे मृत्यूपत्र करून देण्यात येणार आहे. 

जगभरात सध्या मृत्यूनंतर त्याच्या इंटरनेटवरील विविध खात्याचे अधिकार आपोआप त्याच्या जवळच्या व्यक्तीकडे देण्याचा कायदा करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. जीमेल आणि गुगल प्लस या इ-मेल सेवा देणाऱ्या संस्था ‘कार्यरत नसणारे खाते व्यवस्थापक’ असा एक टूल उपलब्ध करून देत आहे. या माध्यमातून नामनिर्देशन भरून मृत्यूनंतर इ-मेल खात्याचे काय करायचे, याबाबत माहिती देण्यात येईल. त्यात एक कालावधी निश्चित करावयाचा असून खातेधारकाच्या मृत्यूनंतर ते खाते आपोआप निष्क्रिय होईल अथवा मेलवर वारसदार नेमल्यास त्या मृत व्यक्तीच्या नावाने येणारे सर्व मेल वारसदाराला येतील. ही सुविधा जीमेल किंवा गुगल वापरणाऱ्यांसाठी असली तरीही फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या जगभरात मोठी आहे. कित्येकदा व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे फेसबुक खाते सुरूच असते. फेसबुकमधील मित्रांच्या यादीतील ज्या मित्रांना त्याच्या मृत्यूविषयी माहिती नाही ते त्याच्या वाढदिवसाला त्याच्या फेसबुक खात्यावर शुभेच्छा देण्याचे प्रकारही घडून आलेले आहेत. त्यामुळेच आता फेसबुकने खातेधारकाच्या मृत्यूनंतर फेसबुक खात्याचे मृत्यूपत्र करून देण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे खातेधारकाला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्याचे काय करायचे, हे ठरविण्याची मुभा मिळणार आहे. त्यात मृत्यूनंतर फेसबुक खात्याचे काय करायचे, याबाबतचे काही पर्याय खातेधारकासमोर असतील. आठवण म्हणून हे खाते जतन करता येईल किंवा मृत्यू झाल्याचे कागदोपत्री सिद्ध झाल्यानंतर ते कायमस्वरूपी निष्क्रिय करता येईल.
फेसबुक खात्याच्या मृत्यूपत्रात ज्या व्यक्तीची वारसदार म्हणून नोंद करण्यात येईल ती व्यक्ती त्या खात्यावरचे फोटो आणि पोस्ट पाहू शकेल. मात्र, यातही खासगी संदेश ती व्यक्ती पाहू शकणार नाही, याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. फेसबुकवर हे नामनिर्देशन केले नसेल आणि मृत्यूपत्रात तसा उल्लेख नसेल तर त्या मृत व्यक्तीच्या इच्छेचा सन्मान करत तशी मुभा त्या व्यक्तीला देण्यात येईल. फेसबुक त्यांच्या खातेधारकासाठी लवकरच ही सेवा उपलब्ध करून देणार आहे.