नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी आज ‘भारत बंद’चा नारा दिला आहे. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, कर्नाटकमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनीही सक्रिय पाठिंबा दिला आहे. काँग्रेचे खासदार राहुल गांधी यांनीही या देशव्यापी आंदोलनाला समर्थन दिलं आहे. बिहारमध्येही प्रमुख विरोधक असणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करत या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. बिहारमधील दरभंगामध्ये तर आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी चक्क म्हशींवर बसून नव्या कृषी विधेयकांना विरोध केला आहे. एएनआयने यासंदर्भातील काही फोटो ट्विट केले आहेत.

एकीकडे आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी म्हशींवर बसून आंदोलन केलं तर दुसरीकडे आरजेडीचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी ट्रॅक्टर चालवून आंदोलनाला पाठिंबा दिला. तेजस्वी यादव यांनी पाटणा शहरातील रस्त्यांवर काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या आंदोलनात सहभाग घेताना ट्रॅक्टर चालवला.

आज विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात देशभरातील ३० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या संघटनाही बंदमध्ये सहभागी झाल्यात. संसदेत संमत करण्यात आलेल्या तीन शेतीविधेयकांमुळे हमीभावाबाबत साशंकता निर्माण झाली असून कृषी बाजाराची व्यवस्थाही बंद होण्याचा धोका आहे. केंद्र सरकारची ही धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा दावा शेतकरी संघटना करत आहेत. काँग्रेससह १५ विरोधी पक्षांनीही या शेती विधेयकांना विरोध केला असून राष्ट्रपतींना या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती परत पाठवण्याची विनंती केली आहे.

पंजाबमध्ये ‘रेल रोको’

केंद्राने पारित केलेल्या शेतकी विधेयकांच्या विरोधात पंजाबमधील शेतकऱ्यांनी गुरुवारी तीन दिवसांचे ‘रेल रोको’ आंदोलन सुरू केले. त्यांच्याशी संघर्ष टाळण्यासाठी रेल्वेने अनेक गाडय़ा स्थगित केल्या. या आंदोलनामुळे २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान विशेष गाडय़ांच्या १४ जोडय़ा धावणार नाहीत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन, तसेच रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. स्थगित करण्यात आलेल्या गाडय़ांमध्ये अमृतसर- मुंबई सेंट्रल गोल्डन टेंपल मेल, हरिद्वार- अमृतसर जनशताब्दी एक्स्प्रेस, नवी दिल्ली- जम्मूतावी, अमृतसर- न्यू जलपैगुडी कर्मभूमी एक्स्प्रेस, नांदेड- अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आणि अमृतसर- जयनगर शहीद एक्स्प्रेस यांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक मालगाडय़ा व पार्सल गाडय़ांच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. करोना महामारीमुळे सध्या नियमित प्रवासी गाडय़ांच्या सेवा स्थगित आहेत. ‘रेल रोको’चे आवाहन किसान मजदूर संघर्ष समितीने केले होते आणि नंतर अनेक शेतकरी संघटनांनी त्याला पाठिंबा जाहीर केला. भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी बर्नाला व संगरूर येथे रेल्वे रुळांवर ठाण मांडले; तर किसान मजदूर संघर्ष समितीच्या झेंडय़ाखाली शेतकऱ्यांनी अमृतसरमधील देवीदासपूर खेडय़ाजवळ आणि फिरोजपूरमधील बस्ती टंकावाला येथे रुळांवर धरणे देण्याचे ठरवले होते.