नवी दिल्लीत संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जंतरमंतर येथे बुधवारी ‘आप’ची सभा सुरू असताना एका शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गजेंद्र सिंह असे या शेतकऱ्याचे नाव असून ते मूळचे राजस्थानमधील दौसा जिल्ह्य़ातील नानगल झामरवाडा गावचे रहिवासी होते.
बुधवारी जंतरमंतर येथे आम आदमी पक्षाची भूसंपादन विधेयकासंबंधी सभा सुरू होती. त्याला पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक मोठय़ा नेत्यांची व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. सभेत आपचे नेते कुमार विश्वास यांचे भाषण सुरू असताना सिंह अचानक उठून जवळच्या कडुनिंबाच्या झाडावर चढले. त्यांनी त्यांच्याजवळील टॉवेलची एक बाजू आपल्या गळ्याला बांधली तर दुसरी बाजू झाडाच्या फांदीला बांधून स्वत:ला खाली झोकून दिले. त्यांना असे करताना पाहून उपस्थितांपैकी अनेकांनी, तसेच कुमार विश्वास यांनीही ओरडून खाली उतरण्यास सांगितले. गर्दीतील दोघे जण त्यांच्या मागोमाग झाडावरही चढले. विश्वास आणि आपचे नेते संजय सिंह यांनी जोराने पोलिसांना बोलावून त्यांना थांबवण्यास सांगितले. पण त्यांनी थांबवण्यापूर्वीच सिंह यांनी गळफास लावून घेतला होता.
सिंह यांना खाली उतरवून ताबडतोब नजीकच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. सुनिल सक्सेना यांनी सिंह यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यांचा मृतदेह नंतर लेडी हार्डिग हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
सिंह यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात त्यांनी आपल्याला तीन मुले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांची जबाबदारी नाकारली म्हणून त्यांनी आत्महत्या केली, असे लिहिले आहे. त्याबरोबरच कागदावर कुटुंबीयांचे दूरध्वनी क्रमांकही लिहिले आहेत. शेवटी ‘जय जवान, जय किसान, जय राजस्थान’ असे शब्द आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांच्याशी याबाबत चर्चा करून चौकशीचे आदेश दिले आहेत.

आत्महत्येवरून राजकारण
भरदुपारी सर्वासमक्ष ही घटना घडल्याने राजधानीतील वातावरण ढवळून निघाले आहे. पण इतके होऊनही केजरीवाल यांनी सभा सुरू ठेवली. आपले भाषण संपल्यावर त्यांनी गजेंद्र सिंह यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मनीष सिसोदिया यांच्यासह थेट रुग्णालयात जात असल्याचे सांगितले.
पण भाजपने सभा सुरू ठेवल्याबद्दल केजरीवाल आणि आपवर टीका केली आहे. त्यावर केजरीवाल यांनी म्हटले की, आम्ही पोलिसांना ओरडून त्या शेतकऱ्याला रोखण्यास सांगत होतो, पण पोलिसांनी जलद हालचाल केली नाही. त्यामुळेच या शेतकऱ्याला प्राणास मुकावे लागले. पोलिसांवर आमचे नियंत्रण नाही हे खरे असले तरी किमान माणुसकीच्या भावनेने जलद कृती करण्यास हरकत नव्हती. आपच्या नेत्यांनी भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचा आरोप केला.    
तसेच या घटनेसाठी पोलिसांची ढिलाई जबाबदार असल्याचे सांगत हा सभा उधळण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.
आपचे नेते आशुतोष यांनी म्हटले की, आता काय दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी झाडावर चढून त्या शेतकऱ्याला थांबवायला हवे होते का? पुढच्या वेळी मुख्यमंत्र्यांना झाडावर चढायला सांगू.