शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे महत्त्वाकांक्षी आश्वासन भारतीय जनता पार्टीनं दिलं आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असल्याचा प्रचार करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीयो कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशभरातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधल्याचे व शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे सांगितल्याचेही समोर आले आहे.

मात्र, एका प्रकरणाचा एबीपी न्यूजने पाठपुरावा केला आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सहभागींना पढवल्याचे समोर आले आहे. छत्तीसगडमधल्या कन्हारपुरीमधली चंद्रमणी नावाची शेतकरी महिला पंतप्रधानांशी संवाद साधताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिला विचारतात की तुझं उत्पन्न किती वाढलं. यावर माझं उत्पन्न दुप्पट झाल्याचं उत्तर ती देताना दिसते.

एबीपी न्यूजनं रीलिज केलेल्या व्हिडीयोनुसार जेव्हा पत्रकार चंद्रमणीला भेटतो व तिचं उत्पन्न दुप्पट झालं का असं विचारतो. तेव्हा ती नाही शेतीतलं आपलं उत्पन्न दुप्पट झालं नसल्याचं सांगताना दिसत आहे. जेव्हा तिला विचारण्यात येतं की तिनं तर पंतप्रधानांना उत्पन्न दुप्पट झाल्याचं सांगितलंय. त्यावेळी ती म्हणते की असं बोलण्यास मला सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.

यामुळे पंतप्रधानांवर टीका करण्याची संधी विरोधकांना मिळाली असून राहूल गांधी व अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत त्यांची खिल्ली उडवली आहे.