कृषी क्षेत्राशी संबंधित कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन आणखी तीव्र होत आहे. २३ ते २८ फेब्रुवारीदरम्यान ‘पगडी संभाल दिवस’ आणि ‘दमन विरोधी दिवस’ यांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी शेतकरी बिलाचा निषेध करण्यासाठी शेतकरी ‘पगडी संभाल दिवस’ साजरा करत आहेत.

केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०२० रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले होते. त्या कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन सुरू आहे. आजपर्यंत सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेसाठी ११ बैठकी झाल्या तरीही कोणता तोडगा निघताना दिसत नाही, हा निषेध चालू ठेवण्यासाठी आम्ही नवीन रणनीती बनवत आहोत आणि २८ फेब्रुवारी रोजी या संदर्भातील योजना आम्ही जाहीर करू असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) २३ फेब्रुवारीला ‘पगडी संभाल दिवस’ आणि २४ फेब्रुवारीला ‘दमन विरोधी दिवस’ साजरा करणार असल्याचे सांगितले आहे. शेतकऱ्यांविषयी आदर ठेवावा आणि त्यांच्याविरोधात दडपशाहीचे उपाय केले जाऊ नयेत म्हणूनच या दिवसांचे आयोजन केले आहे.

‘पगडी संभाल दिवस’ आणि ‘दमन विरोधी दिवस’

२३ फेब्रुवारीला ‘पगडी संभाल दिवस’ चाचा अजितसिंग आणि स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाईल. या दिवशी शेतकरी आपली पारंपरिक पगडी बांधतील.

२४ फेब्रुवारीला ‘दमन विरोधी दिवस’ साजरा केला जाईल. यादिवशी आंदोलनाला दडपण्याच्या सरकारच्या कारवायांविरोधात शेतकऱ्यांसोबत नागरिकही निदर्शनात भाग घेतील. यादिवशी शेतकरी तहसील कार्यालय आणि जिल्हा मुख्यालयांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करतील.