भारतातील शेतकरी आंदोलनावर आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या चर्चा सुरु आहे. जगभरातील सेलिब्रेटिंनी या आंदोलनावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करत पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे भारताच्या प्रतिमेला कुठलाही तडा जाणार नाही, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा- शेतकऱ्यांचे प्रश्न आधी जाणून घ्या मग भूमिका मांडा; संजय राऊतांचा सेलिब्रेटिंना सल्ला

राऊत म्हणाले, “शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आहे, यामुळे भारताच्या प्रतिमेला तडा वैगरे जाईल असं मला वाटत नाही. जगभरात पोटापाण्याच्या विषयावर अशी आंदोलनं होतं असतात, हे खलिस्तानवाद्यांचं आंदोलन नाही की ते देश तोडण्यासाठी उभे आहेत आणि त्यांना पाठिंबा दिला जातोय. मानवतेच्या दृष्टीकोनातून जर जगातील व्यक्तींना भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावसं वाटलं असेल तर त्यावर त्यांनी आपलं मत व्यक्त करण्यात गैर काय? तुम्ही हा विषय भरकटवून कसा काय टाकता?”

आणखी वाचा- कोणताही अपप्रचार भारताचे ऐक्य धोक्यात आणू शकत नाही – अमित शाह

जगभरातून एखाद्या आंदोलनाला पाठींबा मिळणं म्हणजे त्यांचा आपल्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप आहे हे मी मानायला तयार नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा मिळवण्यासाठी जपानला गेले होते. हिटरचाही पाठिंबा मिळवायचा त्यांनी प्रयत्न केला होता. भारतानंही जगभरात जेव्हा जेव्हा मानवतेवर प्रहार झाले तेव्हा आपला पाठिंबा दर्शवलेला आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी केंद्र सरकारला सुनावलं.