दिल्लीच्या सीमारेषांवर गेल्या ३ महिन्यांहून जास्त काळापासून आंदोलक शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन शेतकरी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी चालवलेलं आंदोलन अद्याप संपायचं नाव घेत नाहीये. त्यातच आता आंदोलक शेतकऱ्यांचा उत्तर भारतातल्या कडाक्याच्या थंडीनंतर कडकडीत उन्हाशी सामना होणार आहे. मात्र, निसर्गापुढेही हार न मानण्याच्या तयारीनं शेतकऱ्यांनी आता कंबर कसली आहे. त्यामुळे उन्हाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमारेषेवरच विटांचं कच्चं बांधकाम करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्या भूमिकेवर ठाम राहून दीर्घकालीन संघर्षासाठी शेतकऱ्यांनी तयारी केल्याचं स्पष्ट होत आहे.

 

दीर्घकालीन संघर्षासाठी आंदोलकांची तयारी

हरियाणाच्या टिकरी सीमारेषेवर शेतकरी ही बांधकामं करताना दिसत आहेत. टिक्री बॉर्डर, बहादुरगड रोड या ठिकाणी अशी अनेक बांधकामं होताना दिसत आहेत. त्यामध्ये काही घरांना सिमेंटने पक्कं केलं जात आहे तर काही घरांसाठी मातीच्या थराचा वापर केला जात आहे. आत्तापर्यंत या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, ट्रॉली किंवा कापडी तंबू हेच या शेतकऱ्यांसाठी निवारा होता. पण शेती कामासाठी ट्रॅक्टर आपापल्या गावी पाठवावे लागत असल्यामुळे या शेतकऱ्यांनी कडकडीत उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आता विटांची बांधकामं करायला सुरुवात केली आहे. आंदोलक शेतकरी स्वत:च या घरांचं बांधकाम करत असल्यामुळे फक्त बांधकाम साहित्याचा खर्च त्यांना द्यावा लागत आहे.

सरकारसोबतच्या चर्चेच्या फेऱ्या अपयशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र सरकारसोबत चर्चेच्या १० हून अधिक फेऱ्या झाल्यानंतर देखील अद्याप या समस्येवर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलकांचे नेते राकेश टिकैत यांनी देखील पारित झालेले कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला आहे.