केंद्र सरकारने लागू केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमांजवळ सुरु असणाऱ्या आंदोलनाचा आज ८४ वा दिवस आहे. जवळजवळ तीन महिन्यांपासून सुरु असणाऱ्या या आंदोलनाचा जोर ओसरु लागला आहे असं सांगितलं जात असतानाच ‘भारतीय किसान युनियन’चे प्रवक्ते आणि आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी गरज पडल्यास शेतकरी त्याचं पीक जाळतील पण आंदोलन सुरु ठेवतील असा इशारा सरकारला दिला आहे.

हरणायामधील खरक पुनिया येथे शेतकऱ्यांसमोर भाषण देताना टिकैत यांनी आंदोलक शेतकरी मागे घटणार नाहीत असं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. “पीक पेरणी आणि शेतीच्या इतर कामांसाठी शेतकरी परत जातील असा गैरसमज केंद्र सरकारने ठेऊ नये. जर त्यांनी बळजबरी केली तर आम्ही आमचं पीक जाळू पण आंदोलनातून मागे हटणार नाही. हे आंदोलन दोन महिन्यामध्ये थंड होईल असा समज सरकारने करुन घेऊ नये. आम्ही शेतीही करु आणि आंदोलनही सुरु ठेऊ,” असं टिकैत यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच टिकैत यांनी सरकारला डोकं आणखीन खराब करु नये अशा शब्दांमध्ये इशारा दिला होता. “सरकारने जास्त डोकं खराब करू नये, सध्या तरी देशातील जवान व शेतकऱ्यांनी कायदा परत घेण्याचाच नारा दिलेला आहे, अजून त्यांनी सत्ता परत करण्याचा नारा दिलेला नाही,” असं टीकैत म्हणाले होते. दिल्लीच्या वेशींवरील आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी होत असून केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या तर आंदोलन थांबेल, अन्यथा शेतकरी घरी जाणार नाही, असंही टिकैत यांनी म्हटलं होतं.

केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहे. मग, संघटना नेते केंद्राला प्रस्ताव का देत नाहीत?, या प्रश्नाला उत्तर देताना टिकैत यांनी, “आम्हीदेखील केंद्राशी चर्चा करायला तयार आहोत. आम्ही प्रस्ताव यापूर्वीच दिले आहेत. आता प्रस्ताव केंद्र सरकारकडून आला पाहिजे. त्याशिवाय, पुढील संवाद होऊ शकत नाही. केंद्राने शेतकरी संघटनांना आमंत्रण देऊन चर्चा पुन्हा सुरू करावी. केंद्राने तोडगा आज काढावा, नाही तर १० दिवसांनी वा दोन वर्षांनी.. तोडगा निघेपर्यंत आंदोलन होणारच,” असं म्हटलं होतं.