त्रिपुरात डाव्यांची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपाने डाव्यांचा गड सर केला. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ पडली ती विप्लबकुमार देव यांच्या गळ्यात. विप्लबकुमार देव यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. त्रिपुरात आज दिवाळी साजरी होते आहे असे वाटते आहे. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील जनतेचे कौतुक केले.

आज जे भाजपाच्या विरोधात बसले आहेत त्यांच्याकडे इतकी वर्षे त्रिपुराची सत्ता होती. त्यांचा अनुभव मोठा आहे. आपल्याला त्यांच्याकडूनही अनेक गोष्टी शिकता येतील. त्यांच्याकडे अनुभव आहे आपल्याकडे उत्साह आहे. यावेळी त्यांनी माणिक सरकार यांचेही उदाहरण दिले. माणिक सरकार वयाच्या ४९ व्या वर्षी त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर २० वर्षे त्यांच्याकडे त्रिपुराचे मुख्यमंत्रीपद होते. आता विप्लबकुमार देव ४८ वर्षांचे आहेत मी त्यांनाही शुभेच्छा देतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

त्रिपुरात भाजपाला मिळालेला विजय हा ऐतिहासिक आहे. देशाच्या राजकीय इतिहासात या विजयाची खास नोंद घेतली जाईल. त्रिपुराचा विजय कधीही विस्मृतीत जाणार नाही. आज राज्यात दिवाळी साजरी होते आहे. विकास आणि प्रगतीचे दिवे लागले आहेत याचा मनस्वी आनंद होतो आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी विप्लबकुमार देव यांचा शपथविधी सोहळा आगरतळा या ठिकाणी झाला. या शपथविधी सोहळ्याला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या सगळ्यांची उपस्थिती होती.

भारताच्या राजकारणात अनेकदा निवडणुका कशा पार पडल्या याची चर्चा होते. तशीच त्रिपुरा येथील निवडणुकीची आणि भाजपाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची कायम चर्चा होईल. जनतेचा कौल कसा असतो हा विषय चर्चेला आला तर त्रिपुराचे उदाहरण दिले जाईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.