सिंगापूर हे शहर-राष्ट्र असून ते जगात राहण्यासाठी सर्वात चांगले शहर मानले जाते. त्याच्या स्वातंत्र्याला ९ ऑगस्टला पन्नास वर्षे पूर्ण झाली. सिंगापूरच्या उभारणीचे श्रेय ली कुआन यू यांना जाते ते माजी पंतप्रधान होते. या देशात एकाच राजकीय पक्षाची सत्ता आहे व माध्यमांच्या स्वातंत्र्याला खूप मर्यादा आहेत. जगातील चौथे आर्थिक केंद्र म्हणून सिंगापूर प्रसिद्ध आहे. जगातील सर्वोत्तम बंदर म्हणूनही ते प्रसिद्ध असून मूडीज या पत मानांकन संस्थेने त्यांना एएए असे क्रेडिट रेटिंग दिले आहे. सिंगापूरची स्थापना १८१९ मध्ये सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्स यांनी केली. नंतर १९६३ मध्ये सिंगापूर ब्रिटिश वसाहतीतून बाहेर पडला व मलेशियात विलीन झाला. नंतर ९ ऑगस्ट १९६५ रोजी मलेशियातून सिंगापूरची हकालपट्टी होऊन तो स्वतंत्र झाला. या देशात आता सिंग्लिश म्हणजे सिंगापुरी इंग्रजी व मँडरिन या भाषा आहेत. सिंगापूर डॉलर हे चलन असून ली सियान लुंग हे पंतप्रधान आहेत.

आर्थिक आव्हाने
सध्या सिंगापूरची आर्थिक स्थिती चांगली असली तरी आता बदल होत आहेत. गेल्या वर्षी एकूण देशांतर्गत उत्पन्न २.९ टक्के होते, तर गेल्या पन्नास वर्षांत ते ७.५ टक्के होते. गेल्या काही दशकात ते ५ टक्क्य़ांपेक्षा जास्त असल्याने आता उतरण लागली आहे. लोकसंख्या वेगाने वाढत असून कुशल कामगार येत आहेत. जगातील सर्वात विकसित अर्थव्यवस्थेत सिंगापूरचा समावेश होतो. विकासाचा दर जागतिक म्हणजे अडीच ते तीन टक्के दराने वाढत असला तरी जीवनमान तुलनेने मात्र उंचावताना दिसत नाही.
प्रसारमाध्यमे
२०१५ च्या प्रसारमाध्यमे स्वातंत्र्य निर्देशांकात सिंगापूरचा क्रमांक १८० देशात १५३ वा होता म्हणजे रशियाच्या खाली व लिबियाच्या वर होता. २०१४ च्या तुलनेत तो तीन घरांनी खाली घसरला. स्थानिक माध्यमांवर खूप नियंत्रणे असली तरी समाज माध्यमांतून लोक आवाज उठवित आहेत. पुढील पन्नास वर्षांत माध्यमांवरचे हे नियंत्रण तसेच राहील अशातला भाग नाही.

हरित देश
आशियातील
सर्वात हरित देश म्हणून त्याची प्रसिद्धी असून आशियातील सर्वाधिक अब्जाधीशांची संख्या तेथे आहे. लोकसंख्या ५५ लाख असून त्यात २१ लाख परदेशी नागरिक आहेत. क्षेत्रफळ ७५० चौरस कि.मी. आहे व हरित इमारतींचे निकष तेथे पाळले जातात.

राजकीय स्थिती
सिंगापूरला पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी असून त्यांचेच वर्चस्व आहे. १९५९ पासून सर्व निवडणुका त्यांनीच जिंकल्या असून तेथे स्थिरता आहे, पण साचलेपणाचा धोकाही आहे.

सिंगापूरची धोरणे मात्र बदलत असून नवप्रवर्तन नेहमीच होत आहे. उदारमतवादी व सर्व देशांच्या लोकांना सामावून घेतले आहे हे त्या देशाचे वैशिष्टय़ आहे. ज्याने बदल होईल त्या गोष्टी करा हा ली कुआन यू यांचा कानमंत्र होता.

मूक क्रांती
सिंगापूरमध्ये नकळत बदल होत आहेत प्रा. राहुल सागर यांच्या मते तेथे मूक क्रांती होते आहे. गेली
पन्नास वर्षे तेथे सरकारच्या हाती सूत्रे होती व जबाबदारीने कामे पार पाडली जात होती.
> सिंगापूरला तिसऱ्या जगातून पहिल्या जगात नेण्यात आले. आता सत्तेचा समतोल ढळू लागला आहे. सिंगापूरचे आताचे नेतृत्व बुद्धिमान आहे पण आता सामान्य सिंगापूरकरांच्या इच्छाही पूर्ण कराव्या लागत आहेत. त्यामुळे सिंगापूरचे लोक जबाबदारीने काही अपेक्षा ठेवत असतील तर ठीक आहे नाही तर वाचवायला ली कुआन यू नाहीत.