आसाममधील गोलपाडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सोशल मीडियावर अवमानजनक मजकूर लिहिल्याच्या आरोपाखाली एका सरकारी शाळेतील शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अमिताव सिन्हा यांनी याची माहिती दिली. अबू तालिब असे या शिक्षकाचे नाव असून ते लखीपूर येथील उच्च माध्यमिक शाळेत हिंदी विषयाचे शिक्षक आहेत. तालिब यांच्याविरोधात दोघांनी तक्रार दाखल केली आहे. यापैकी एक तक्रार भाजपाच्या कार्यकर्त्याने तर दुसरी तक्रार गोलपाडा येथील शाळा निरीक्षकाने दाखल केली आहे. अबू तालिब यांना निलंबित केल्याचे सांगण्यात येते.

एखाद्या नेत्याविरोधात सोशल मीडियावर लिखाण केल्याप्रकरणी कारवाई होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी आग्रा पोलिसांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात अवमानजनक पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला अटक केली होती. विशेष म्हणजे ती व्यक्ती सोशल मीडियावर उर्दू भाषेत या पोस्ट करत. नंतर तपासात त्या व्यक्तीचे नाव विनीतप्रताप सिंह निष्पन्न झाले होते. पोलिसांनी सिंहविरोधात आयटी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल केला होता. याचदरम्यान आणखी एका व्यक्तीने योगी आदित्यनाथ यांचे आक्षेपार्ह छायाचित्र शेअर केले होते. त्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली होती.