अमेरिकेत करोना संसर्गाच्या थैमानादरम्यान प्रतिबंधक लसीचा पहिला डोस सोमवारी देण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाचं अभिनंदन करताना ट्विटद्वारे ही माहिती दिली. करोनाच्या संसर्गाने त्रस्त असलेल्या अमेरिकेत फायजरच्या लसीकरणाला मंजूरी देण्यात आली आहे.

अमेरिकेत देण्यात आलेला करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस एका नर्सला देण्यात आला आहे. यापूर्वी एफडीएद्वारे लसीला मंजुरी दिल्यानंतर लगेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका व्हिडिओद्वारे याची माहिती दिली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, “आज आमच्या देशात एक वैद्यकीय चमत्कार झाला आहे. करोनावर आम्ही केवळ नऊ महिन्यात सुरक्षित आणि प्रभावी औषध उपलब्ध करुन दिलं आहे. ही लस तयार करणारे वैज्ञानिक, तंत्रज्ञ, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले होते. ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, फाइजर आणि मॉडर्ना या कंपन्यांनी घोषणा केली होती की, त्यांनी विकसित केलेली लस ही सुमारे ९५ टक्के प्रभावी आहे. ज्यांचे परिणाम हे अपेक्षेपेक्षा खूपच चांगले आणि सुरक्षित आहेत.”

ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, “अमेरिका जगातील असा पहिला देश आहे. ज्यांनी सुरक्षित आणि प्रभावी लस विकसित केली आहे. आजची लस ही अमेरिकच्या अमर्याद क्षमतेची आठवणं करुन देते. ही लस अमेरिकन नागरिकांना नि:शुल्क उपलब्ध करुन दिली जाईल. फेडेक्स आणि युपीएस यांच्या सहकार्याने आम्ही प्रत्येक राज्य आणि देशातील कानाकोपऱ्यात ही लस पोहोचवण्याचं काम सुरु केलं आहे. मंजुरीनंतर २४ तासांपेक्षा कमी वेळेत पहिला डोस देण्यात येत आहेत.”