News Flash

सरकारपुढे अन्नधान्य महागाईचे आव्हान!

रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीची गुरुवारी बैठक

|| हरीश दामोदरन / पार्थ सारथी बिश्वास

रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीची गुरुवारी बैठक

रोडावलेली रोजगारनिर्मिती, मंदावलेला आर्थिक विकासदर आणि अमेरिकेने काढून घेतलेला विशेष व्यापार दर्जा यापाठोपाठ अन्नधान्य महागाई हे सरकापुढील आणखी एक आव्हान ठरणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या गुरुवारी होणाऱ्या आढावा बैठकीत व्याजदरांमध्ये कपात केली जाण्याची अपेक्षा असताना अन्नधान्य महागाई ही त्यापुढील मोठी अडचण असणार आहे.

डिसेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत अन्नधान्यांच्या वार्षिक घाऊक किंमतींचा निर्देशांक उणे ०.४२ टक्क्य़ांवरून ७.३७ टक्क्य़ांपर्यंत वाढला आहे. याच काळात, ग्राहक अन्न किंमतीत मागील वर्षांच्या तुलनेत झालेली वाढ बरीच कमी, म्हणजे उणे २.६५ टक्क्य़ांवरून १.१० टक्के इतकी आहे. तथापि, नैऋत्य मान्सूनच्या लांबलेल्या आगमनामुळे अन्नधान्य दरांच्या अनिश्चिततेत भरच पडणार आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यांत, प्रामुख्याने पश्चिम व दक्षिण भारतातील मोठय़ा क्षेत्रांमधील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर काही शेतमालांच्या किंमती वाढल्या आहेत. मार्च ते मे या कालावधीत झालेल्या मान्सूनपूर्व पावसाची टक्केवारी या कालावधीतील सरासरीपेक्षा २४.७ टक्क्य़ांनी कमी आहे. ही घट प्रामुख्याने या दोन भागांमध्येच केंद्रित झालेली आहे.

कर्नाटकच्या दावणगेरे बाजारपेठेतील मक्याचा सरासरी भाव सध्या क्विंटलला २ हजार रुपयांच्या आसपास आहे. गेल्या वर्षी तो १२७० रुपये होता. राजस्थानच्या चोमू आणि महाराष्ट्रातील जळगाव बाजारपेठेत बाजरी आणि ज्वारी अनुक्रमे २ हजार (११४०) व १९०० (११६०) या भावाने मिळत आहे.

चढय़ा दराचा प्रभाव दुग्ध उत्पादनांच्या बाबतीतही जाणवत आहे. शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या दुधाच्या प्रमाणात घट झाल्यामुळे, लोकसभा निवडणुका संपताच अमूल व मदर डेअरी यांसारख्या कंपन्यांनी दुधाचे दर लिटरमागे २ रुपयांनी वाढवले आहेत. चारा आणि पाणी यांची टंचाई, मक्याचे आणि इतर पशुखाद्यांचे वाढलेले दर यामुळे दुधाचे उत्पादन कमी झाले आहे.

केरळमध्ये मोसमी आगमन होण्याची सरासरी तारीख १ जून असताना, यंदा तेथे पाऊस ६ जूनच्या सुमारास येईल, हा आपला पूर्वीचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने कायम ठेवला आहे.

डाळी महाग

डाळींच्या किमतीतही मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. लातूरमध्ये तूरडाळीचे भाव क्विंटलमागे ३६५० रुपयांवरून ५९५० रुपये; राजस्थानातील नागौरमध्ये मूगडाळीचे भाव ४६०० वरून ६ हजार रुपये, तर मध्यप्रदेशातील टिकमगड येथे उडीद डाळीचे भाव २९५० रुपयांवरून ४१०० रुपयांवर पोहचले आहेत. घाऊक बाजारातील दरवाढीमुळे किरकोळ बाजारातील किमतीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 1:50 am

Web Title: food inflation rbi bjp
Next Stories
1 अमेरिकेचे व्हिसा धोरण कडक
2 भाजपला डावलून बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार
3 रस्ते अपघातात क्वीन हरीशसह चार लोककलावंतांचा मृत्यू
Just Now!
X