मुस्लिम समाज कायदा मानत नाही आम्ही फक्त तेच मानतो जे कुराणात लिहिले आहे असे वक्तव्य करत समाजवादीचे नेते आझम खान यांनी तिहेरी तलाक विधेयकावर टीका केली आहे. तिहेरी तलाक विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली त्यावेळी काँग्रेस आणि इतर विरोधकांनी सभात्याग केला. आता याप्रकरणी विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तिहेरी तलाक विधेयकाचा गैरफायदाच घेतला जाईल असे ओवेसी यांनी म्हटलेले असतानाच दुसरीकडे आझम खान यांनीही यावर टीका केली आहे.

तिहेरी तलाक विधेयकाशी भारतातील मुस्लिमांचा काहीही संबंध नाही. तलाकबाबत फक्त भारतातच नाही तर जगभरात फक्त कुराणमध्ये लिहिले आहे तेच मानले जाते इतर कोणता कायदा आम्हाला माहित नाही त्याच्याशी आमचा संबंध नाही असेही आझम खान यांनी म्हटले आहे. कुराण शिवाय आम्ही काहीही मानणार नाही हे लक्षात ठेवा असेही आझम खान यांनी खडसावले आहे.

सरकारने आधी त्या महिलांना न्याय दिला पाहिजे ज्या महिलांना त्यांच्या नवऱ्याने स्वीकारले नाही. गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत जे मारले गेले त्यांना सरकारने न्याय द्यावा. तलाकवर तुम्ही कायदा केला असेल तरीही अल्लाहच्या कायद्यापेक्षा आणि त्याच्या न्यायापेक्षा मोठे काहीही नाही असेही आझम खान यांनी म्हटले आहे. कोणी कोणाला तलाक द्यायचा हा आमचा खासगी प्रश्न आहे असेही खान यांनी स्पष्ट केले.