बिश्केकमध्ये होणाऱ्या शांघाई सहकार संघटनेच्या (एससीओ) परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हीव्हीआयपी विमान पाकिस्तानच्या हद्दीतून जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. तर हे विमान ओमान, इराण आणि मध्य आशियातील देशांच्या हवाईमार्गे किर्गिझस्तानला जाणार आहे.

SCO परिषदेकरीता पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून विमान नेण्यासाठी भारताने पाकिस्तानकडे परवानगी मागितली होती. या मागणीला पाकिस्तानकडून हिरवा कंदीलही दाखवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा मार्ग न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मोदींचे व्हीव्हीआयपी विमान बिश्केकला नेण्यासाठी दोन मार्गांचा विचार करण्यात येत होता. त्यानंतर अखेर ओमान, इराण आणि मध्य आशियातील देशांच्या हवाई हद्दीतून हे विमान नेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. किर्गिझिस्तानची राजधानी बिश्केक येथे १३ आणि १४ जून रोजी शांघाय सहकार्य संघटनेची परिषद (SCO) पार पडणार आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

भारतीय हवाई दलाच्या विमानांनी २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील बालाकोट येथे घुसून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. तेव्हापासून पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द पूर्णपणे बंद केली आहे. मात्र, SCO परिषदेला जाण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या विमानाला थेट पाकिस्तानी हवाई हद्दीतून जाता यावे यासाठी पाकिस्तानकडे परवानगी मागण्यात आली होती. भारताची ही मागणी विशेष बाब म्हणून पाकिस्तानने मान्य करीत परवानगी दिली होती.