परराष्ट्रसचिव एस. जयशंकर यांच्या आगामी इस्लामाबाद भेटीत भारतासोबत प्रलंबित असलेल्या सर्व मुद्दय़ांवर चर्चा करण्यात येईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
भारताशी अर्थपूर्ण संवाद करण्याबाबत पाकिस्तान वचनबद्ध असून, आतापर्यंत आम्ही कधीही पाऊल मागे घेतलेले नाही, असे विदेश कार्यालयाच्या प्रवक्त्या तस्नीम अस्लम म्हणाल्या. भारतीय परराष्ट्र सचिवांच्या भेटीच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. अरबी समुद्रात स्फोटामुळे नष्ट झालेल्या ‘बोटी’च्या वादाबाबत तस्नीम यांनी भारतावर टीका केली. पाकच्या बोटी या घटनेत सहभागी नसल्याचे आम्ही आधीच सांगितले होते. उच्चपदस्थ भारतीय अधिकाऱ्यांच्या विसंगत वक्तव्यांमुळे, बोट प्रकरण हे एक नाटक होते व ते उघडकीस आले असल्याचे सिद्ध झाले आहे, असे त्या म्हणाल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 3:02 am