करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सध्या चौथा टप्पा सुरू आहे. ३१ मे पर्यंत लॉकडाउनचा हा चौथा टप्पा सुरू राहणार आहे. दरम्यान, या कालावधीत केंद्र सरकारनं सुटदेखील दिली आहे. तसंच श्रमिकांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी ट्रेनचीदेखील व्यवस्था केली आहे. यादरम्यान विशेष श्रमिक ट्रेननं उदयभान सिंग हे आपल्या पत्नीसह मुंबईहून उत्तर प्रदेशात जाण्यासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांच्या प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. त्यावेळी त्यांच्या पतीनं रेल्वेच्या मदत क्रमांकावर मदत मागितली. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांनी मुलाला जन्म दिला.

दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला लॉकडाउन असं नाव दिलं. अशाप्रकारे करोनाच्या कालावधीत सुरू असलेल्या लॉकडाउनदरम्यान लॉकडाउन यादवचं स्वागत करण्यात आलं. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीदेखील त्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच यावरू त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला.

अखिलेश यादव यांनी यासंबंधी एक ट्विट केलं आहे. “करोनाच्या काळात रेल्वे प्रवासादरम्यान जन्मलेल्या लॉकडाउन यादव याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो. नोटबंदीच्या कालावधीत लागलेल्या लाईनमध्ये जन्म झालेल्या मुलाला आता एकटेपणा वाटणार नाही. त्यांचा ज्या कठिण परिस्थितीत जन्म झाला त्यापेक्षा त्या मुलांचा पुढील प्रवास चांगला असावा याची भाजपा सरकारनं काळजी घ्यावी,” असं अखिलेश यादव म्हणाले.

सिंग कुटुंबीय उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर या परिसरातील रहिवासी आहेत. ते श्रमिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेनं आपल्या मूळ गावी निघाले होते. परंतु प्रवासादरम्यान उदयभान सिंग यांच्या पत्नीला प्रसुती कळा सुरू झाल्या. त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे याबाबत मदत मागितली. त्यानंतर त्यांना बुरहानपूर रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आलं. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं त्यांना त्वरित नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. त्या ठिकाणी त्यांनी मुलाला जन्म दिला.